रवींद्र धंगेकर यांच्यावर टांगती तलवार तयार करण्यात आली:पत्नीला अटक होण्याची भीती वाटल्याने त्यांचे पक्षांतर; संजय राऊतांचा आरोप

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्या रवींद्र धंगेकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार तयार करण्यात आली होती. त्यांच्या पत्नीला अटक होण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांनी पक्षांतर केले असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पुण्यातील काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावरून संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला. अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या पक्षात तसेच भाजपमध्ये जे प्रवेश होत आहेत, ते सरळ सरळ भीतीपोटी होत आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. स्वतः एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सर्व आमदारांनी त्याच भीतीपोटी पक्षांतर केलेले आहे. अजित पवार आणि त्यांच्या लोकांनी देखील त्याच भीतीपोटी पक्षांतर केले आहे. भारतीय जनता पक्षामध्ये आमचे जे लोक गेले ते देखील त्याच भीतीपोटी गेले असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. एखाद्याने प्रवेश करावा म्हणून त्याची आर्थिक कोंडी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच त्याच्यावर काही जुनी प्रकरणे असली तर त्याचा दबाव आणला जातो. अशी सिस्टिम पक्षांतराच्या मागे असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. रवींद्र धंगेकर हे खरोखर का गेले? हे त्यांनी ते मानत असलेल्या दैवताला स्मरुन सांगायला हवे, असे आव्हान देखील त्यांनी दिले. 60 कोटींच्या कसबा येथील जमिनीवरुन दबाव कसबा विधानसभा मतदारसंघांमध्ये एक जागा आहे. ती प्रतिभा रवींद्र धंगेकर आणि इतर पार्टनर यांच्या नावावर आहे. हा त्यांचा व्यवसायिक प्रश्न असला तरी त्या जागेची किंमत 60 कोटी असल्याचे बोलले जाते. ही जागा त्यांनी विकासासाठी ताब्यात घेतल्यावर लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने ही जागा वक्फ बोर्डाची अल्याचे सांगून काही मुस्लिमांना हाताशी धरून धंगेकर यांच्या विरुद्ध भाजपचे लोक कोर्टात गेले. त्यामुळे धंगेकर यांचे काम अडवण्यात आले आणि त्या कामाला स्थगिती देण्यात आली. या सर्व प्रकरणामुळे प्रतिभा धंगेकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार निर्माण करण्यात आली. धंगेकर यांनी पक्ष सोडावा असे सर्व वातावरण तयार करण्यात आले. अखेर गुंतवणूक केलेल्या एका मराठी माणसाने पक्षांतर केले. त्यांच्यासोबत जे पार्टनर आहेत ते देखील भाजपचे माजी नगरसेवक आहेत. मात्र एवढी मोठी गुंतवणूक झाल्यानंतर कामाला स्थगिती देण्यात आली. पत्नीवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आणि अखेर पत्नीवर अटकेची तलवार असल्यामुळे विकास कामाच्या आडून आमचे प्रिय रवींद्र धंगेकर हे शिंदे गटात प्यारे झाले, अशा शब्दात संजय राऊत यांनी या पक्षांतरावर निशाणा साधला. रवींद्र वायकर यांच्यावर देखील अशाच पद्धतीने दबाव हा केवळ रवींद्र धंगेकर यांचा विषय नाही. तर यापूर्वी झालेले 90% पक्षांतर हे अशाच दबावतच झाले आहे. रवींद्र वायकर यांच्यावर देखील अशाच पद्धतीने दबाव होता. त्यांना देखील अशाच पद्धतीने ताब्यात घेण्यात आले आहे. स्वतः एकनाथ शिंदे हे देखील असेच घाबरून पळून गेले आहेत. त्यांच्यासोबतचे अनेक आमदार हे ईडी आणि सीबीआयच्या कारवायांना घाबरूनच गेले असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.