मयत सरपंच देशमुख कुटूंबीयांना माजलगावकरांचा मदतीचा हात:तासाभरातच 13 लख 68 हजार रूपयांचा मदतनिधी जमा

केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेचे सर्वत्र पडसाद उमटले असून माजलगावकरांनी मात्र त्यांची असलेली मदतीची परंपरा जोपासली आहे. मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटूंबीयांना मदतीचा हात देत आज दि. 11 डिसेंबर रोजी विवीध पक्ष व संघटनांच्या झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत अवघ्या एका तासात 13 लख 68 हजार रूपयांचा मदतनिधी जमा झाली आहे. तसेच शुक्रवारी शहरातील संभाजी महाराज चौकातून सकाळी 10.30 वाजता मदतफेरीचे आयोजनही करण्यात आले आहे. तसेच प्रशासनाला निवेदन देखील देण्यात येणार आहे. शहरातील सुंदरराव सोळंके महाविद्यालयात आज आमदार प्रकाश सोळंके यांच्यावतीने विवीध सामाजिक संघटना, व्यापारी महासंघ, वकील संघटना, पतसंस्था संघटना, पत्रकार संघ, रोटरी क्लब, सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सांगली येथील जवान चंद्रशेखर मोरे यांच्या कुटूंबीयांना दिलेल्या मदतीप्रमाणेच देशमुख कुटूंबीयांना देखिल मदत देण्यासाठी निर्णय घेण्यात आला. यानंतर मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटूंबीयांना मदत व्हावी यासाठी शुक्रवारी शहरामध्ये मदतफेरीचे आयोजन करण्यात आले असून सात दिवस मदत संकलन करण्यात येणार आहे. यासाठी या मदतफेरीस सर्व संघटना, पदाधिकारी, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. झालेल्या घटनेचा निषेध करत सरपंच संतोष देशमुख यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली तर परभणी येथे झालेल्या घटनेचाही निषेध या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आला. या घटनेवर बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके प्रतिक्रिया देत म्हणाले, काही राक्षसी प्रवृत्तीचे लोक जिल्ह्यात दहशत निर्माण करत आहेत. सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणात स्थानिक पोलिसांना तपास न देता यात एसआयटी स्थापन करा, अशी मागणी सोळंके यांनी केली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या, मस्साजोग ता. केज येथील माजी सरपंच संतोष देशमुख यांचा खून झाल्याची घटना नुकतीच घडली. त्याचप्रमाणे परळी येथील तरूण व्यापारी अमोल डुबे यांचे काल रात्री काही लोकांनी अपहरण करून लूटमार केली याबाबत माहिती प्राप्त झाली. या दोन्ही घटनांबरोबरच जिल्ह्यात अलिकडच्या काळात घडलेल्या घटना चिंताजनक आहेत पोलिसांनी या दोन्ही घटनांची स्पेशल इन्व्हिस्टीगेशन टीमद्वारे सखोल चौकशी करावी, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांना देखील भेटून चर्चा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

  

Share