25 जानेवारीपर्यंत आरक्षण न दिल्यास सळो की पळो करणार:मनोज जरांगेंचा सरकारला इशारा; म्हणाले – तुम्ही बलाढ्य असाल, मात्र मराठ्यांपुढे सत्ता टिकत नाही
मराठा आंदोलन मनोज जरांगे यांनी आज पुन्हा एकदा मराठा आरक्षण प्रश्नावरून सरकारला इशारा दिला आहे. 25 जानेवारीपासून मराठा आरक्षणासाठी पुन्हा एल्गार पुकारणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. 25 जानेवारीपर्यंत आरक्षण दिले नाही, तर सरकारला सळो की पळो करून सोडणार, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. तुम्ही सत्तेत असाल, बलाढ्य असाल मात्र मराठ्यांपुढे सत्ता टिकत नाही, हे तुम्हाला 25 जानेवारीला दिसून येईल, असेही ते म्हणाले. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारला 25 जानेवारीपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. ते आज बीड दौऱ्यावर असताना बोलत होते. यावेळी त्यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणावरूनही सरकारला धारेवर धरले. राजकीय नेत्यांच्या दबावामुळे पोलिस आरोपीला पकडत नाहीत का? अशी शंका त्यांनी यावेळी उपस्थित केली. काय म्हणाले मनोज जरांगे?
मराठा समाजाला गांभीर्याने घेतले नाही तर काय होते? हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनाही माहित आहे. आता फक्त खांदे बदलले आहेत, पण आमच्यात सरळ करण्याची ताकद आहे. 25 तारखेला महाराष्ट्रात काय होईल त्यांना दिसून येईल. त्यांचे भागले म्हणून ते आरक्षणाबाबत बोलत नाही, अशी टीका मनोज जरांगे यांनी सरकारवर केली. या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा विषय तडीला काढावा, अशी मागणी करत तसे न केल्यास 25 जानेवारीला राज्यातील सर्व समाज अंतरवालीला येणार असल्याचे ते म्हणाले. कुणबी नोंदी शोधल्या पाहिजे. कुणबी नोंदणी शोधणारे काही कक्ष बंद पडले आहेत. त्यामुळे प्रमाणपत्र वितरित केले जात नाहीत. म्हणून ते कक्ष सुरू करा, आम्ही याबाबत सरकारला निवेदन दिल्याचे त्यांनी सांगितले. मराठ्यांपुढे सत्ता टिकत नाही मराठा आणि कुणबी एकच आहे त्यामुळे तो अध्यादेश पारित करावा, हैदराबाद गॅजेट लागू करा सगे सोयरे अंमलबजावणी करावी, या सर्व मागण्या 25 जानेवारीच्या आत मान्य करायचे आहेत, नसता मराठा समाज पश्चाताप करायला लावेल, असे मनोज जरांगे यांनी दिला. तुम्ही सत्तेत असाल बलाढ्य असाल मात्र मराठ्यांपुढे सत्ता टिकत नाही, हे तुम्हाला 25 जानेवारीला दिसून येईल. 25 जानेवारीआधी आरक्षण दिले नाही तर सळो की पळो करणार, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला. पोलिस दबावामुळे आरोपीला पकडत नाहीत का?
मनोज जरांगे यांनी यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणावरूनही सरकारला धारेवर धरले. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर एसपी आणि कलेक्टर यांच्याशी बोलणार त्याबरोबरच सरकार बरोबर देखील चर्चा करणार असल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले. दहा दिवस उलटून आरोपी पकडणार नसतील तर आता शंका येत आहे. काही नेत्यांच्या दबावामुळे पोलिस प्रशासन जाणून-बुजून आरोपीला पकडत नाहीत का? अशी शंका मनोज जरांगे यांनी व्यक्त केली. … तर नाईलाजाने रस्त्यावर उतरावे लागेल
आरोपींना जाणून-बुजून आरोपीला पकडणार नसतील, तर पूर्ण मराठा समाज रस्त्यावर उतरेल. समाज तुमच्यावर विश्वास ठेवत असेल आणि तुम्ही विश्वासघात करत असाल, तर आम्ही जास्त दिवस वाट बघणार नाही. नाईलाजाने आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल हे पोलिस प्रशासनाने लक्षात घ्यावे, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. या प्रकरणात सहभागी सर्वांवर तातडीने कारवाई करून अटक करावी. मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून देशमुख कुटुंबाला न्याय देण्यासाठी आरोपीला अटक केली नाही, तर आम्ही हे प्रकरण दाबू देणार नाही, असा इशाराही जरांगे यांनी यावेळी दिला.