रस्ते बंद, सर्व ट्रॅव्हल परमिट रद्द, 200 वर वाहने अडकली:सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन; हजारावर पर्यटक अडकले

हिमालयीन राज्य सिक्कीममध्ये सतत मुसळधार पाऊस व भूस्खलन यामुळे शेकडो पर्यटक ठिकठिकाणी अडकले आहेत. त्याचा सर्वाधिक फटका उत्तर सिक्कीमला बसला. जमीन धसल्यामुळे जवळपास १००० पर्यटक अडकले. सिक्कीम पोलिस म्हणाले, राजधानी गंगटोकपासून १०० किलोमीटरवरील चुंगथांगमध्ये गुरुवारपासून पर्यटकांची २०० हून जास्त वाहने अडकून पडली. अडकलेले पर्यटक जवळच्या गुरुद्वाऱ्यात आश्रयाला गेले आहेत. सर्वाधिक भूस्खलन लाचेन-चुंगथांग मार्गावर मुंशीथांगमध्ये आणि लाचुंग-चुंगथांग मार्गावर लेमा, बॉबदरम्यान झाले. लाचुंग व लाचेनला जाणाऱ्या रस्त्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे सुमारे एक हजार पर्यटक अडकले आहेत. सलग पावसामुळे स्थिती आणखी खराब झाली आहे. यादरम्यान प्रशासनाने शुक्रवारी टूर ऑपरेटर्सना निर्देश दिले. पुढील आदेशापर्यंत पर्यटकांना उत्तर सिक्कीमला आणू नये. यासोबतच येथे येणाऱ्या पर्यटकांना दिलेले सर्व परमिट रद्द करण्यात आले आहेत. यादरम्यान जिल्हाधिकारी अनंत जैन यांनी सांगितले की, अडकलेल्या पर्यटकांना मंगन शहरात पोहोचवल्यानंतर गंगटोकला नेले जाईल. वास्तविक लाचुंग व लाचेन डोंगराळ क्षेत्र आहे. हे ठिकाण निसर्गसौंदर्याची देणगी लाभलेल्या गुरुडोंगमार सरोवर तसेच युमथांग खोरे इत्यादी पर्यटन स्थळाजवळ आहे. दुसरीकडे अरुणाचल प्रदेशातही मुसळधार पावसामुळे रोइंग तसेच अनिनीदरम्यानचा महामार्ग भूस्खलन आणि झाडे कोसळल्याने ठप्प झालेला आहे. यामुळे लोकांची गैरसोय झाली.