रस्ते काँक्रिटीकरण कामात निष्काळजीपणा, मनपाची थेट कारवाई:दुय्यम अभियंता निलंबित, कंत्राटदाराला 50 लाख तर गुणवत्ता देखरेख संस्थेलाही 25 लाखांचा दंड

मुंबईत रस्ते काँक्रिटीकरण कामात निष्काळजीपणा करणे मनपा अधिकाऱ्यासह कंत्राटदाराला चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणात महानगर पालिकेतील दुय्यम अभियंत्याला निलंबित करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणात कंत्राटदाराला 50 लाख रुपयांचा दंड बजावण्यात आला आहे. इतकेच नाही तर या कामावर गुणवत्ता देखरेख संस्थेलाही 25 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेने (BMC) शहरातील रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामांमध्ये आढळलेल्या निष्काळजीपणावर कठोर कारवाई केली आहे. या कारवाईत दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, संबंधित कंत्राटदार आणि गुणवत्ता देखरेख संस्थेवरही दंड ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणात करण्यात आलेली कारवाई दुय्यम अभियंता निलंबित : रस्ते काँक्रीटीकरणाच्या कामात निष्काळजीपणा केल्याच्या आरोपावरून संबंधित दुय्यम अभियंत्याला निलंबित करण्यात आले आहे. कंत्राटदारावर 50 लाखांचा दंड : निकृष्ट दर्जाचे काम केल्याबद्दल संबंधित कंत्राटदारावर 50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. गुणवत्ता देखरेख संस्थेला 25 लाखांचा दंड : कामाच्या गुणवत्तेची योग्य तपासणी न केल्यामुळे संबंधित गुणवत्ता देखरेख संस्थेला देखील 25 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. टेंडर प्रक्रियेतून अपात्रता : दोषी कंत्राटदाराला पुढील दोन वर्षांसाठी BMC च्या कोणत्याही टेंडर प्रक्रियेत सहभागी होण्यास अपात्र ठरवण्यात आले आहे. रेडी-मिक्स काँक्रीट (RMC) प्रकल्पांवर कारवाई : स्लम्प टेस्टमध्ये अपयशी ठरलेल्या दोन RMC प्रकल्पांची नोंदणी रद्द करण्यात आली असून, त्यांना सहा महिन्यांसाठी BMC च्या प्रकल्पांसाठी काँक्रीट पुरवठा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. नेमके प्रकरण काय? मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या उद्देशाने BMC ने सुमारे 12,000 कोटींच्या निधीतून 800 किमी रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 324 किमी रस्त्यांचे काम 31 मे 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. मात्र, अलीकडील तपासणीत काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम आढळून आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही – आयुक्त महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले आहे की, “रस्ते कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामात गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी BMC ने कठोर पावले उचलली आहेत. दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई, कंत्राटदार आणि गुणवत्ता देखरेख संस्थांवर दंड, तसेच टेंडर प्रक्रियेतून अपात्रता यांसारख्या उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे भविष्यातील प्रकल्पांमध्ये गुणवत्ता राखण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.