रोहित पाटील यांचे विधानसभेतील पहिलेच भाषण:’अमृताहूनही गोड देवा तुझे नाव’ म्हणत देवेंद्र फडणवीसांकडून सहकार्याची अपेक्षा

तासगाव- कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार आणि माजी गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी आज सभागृहात पहिल्यांदाच भाषण केले. सभागृह अध्यक्षांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलण्याची संधी त्यांना देण्यात आली. या वेळी पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. तसेच राहुल नार्वेकर सर्वात तरुण अध्यक्ष असून त्यांच्या प्रमाणे आपणही सर्वात तरुण आमदार असल्याचा उल्लेख केला. ‘अमृताहुनही गोड तुझे नाव देवा’ असे म्हणत आमदार रोहित पाटील यांनी फडणवीसांचा उल्लेख केला. संतांच्या माध्यमातून देखील देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेण्यात आले आहे. संतांच्या वाणीतून देखील इतक्या गोड पद्धतीने तुमचे नाव घेतले गेले आहे, त्यामुळे पुढच्या काळात काम करत असताना तुम्ही देखील विरोधी पक्षाला गोड वागणूक द्याल, अशी विनंती मी करत असल्याचे रोहित पाटील यांनी म्हटले आहे. ‘अमृता’हुनी गोड, मी मुद्दामूनच म्हटले असे देखील रोहित पाटील यांनी म्हटले. पुराणात देखील ‘अमृता’ला वेगळे महत्त्व होते आणि आजही आहे. असे देखील ते म्हणाले. या देशाने अनेक ‘शाही’ बघितल्या आाहेत. पण लोकशाही अत्यंत महत्त्वाची ‘शाही’ या देशाच्या वाटेला आली असल्याचे आर. आर. पाटील यांचे पुत्र आमदार रोहित पाटील यांनी म्टले आहे. संपूर्ण जगामध्ये यामुळेच आपला देश स्वतःची वेगळे ओळख टिकवू शकला असल्याचे ते म्हणाले. आपण संसदीय लोकशाही पद्धत मिळवली आणि त्या संसदीय पद्धतीमुळेच आपल्या देशाचे एक वेगळे महत्त्व निर्माण झाले असल्याचेही पाटील यांनी म्हटले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला एक मताचा अधिकार दिला आहे. त्या एकाच्या माध्यमातूनच आपण सर्व आज सभागृहात बसलो आहेत, असे देखील रोहित पाटील यांनी म्हटले आहे. ज्याप्रमाणे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांनी मान मिळवला, त्याचप्रमाणे मी देखील सर्वात तरुण आमदार म्हणून या सभागृहात आलो असल्याचे रोहित पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे तुमचे लक्ष माझ्याकडे राहावे, अशी मागणी पाटील यांनी नार्वेकरांकडे केली आहे. यावेळी रोहित पाटील यांनी राहुल नार्वेकर यांना आपल्या वकीलची आठवण करून दिली. आपण एक वकील आहात पहिल्या क्रमांकाच्या बाकावर बसणाऱ्या वकिलाकडे ज्याप्रमाणे लक्ष आहे, त्याप्रमाणे माझ्यासारख्या वकिलीचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीकडे देखील लक्ष ठेवा, अशी मागणी देखील त्यांनी केली. अनेक मोठी नावे या सभागृहामध्ये घडली आहेत. या सभागृहाची खूप मोठी परंपरा निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अशा काळात राहुल नार्वेकर यांनी यांची कारकीर्द पाहिली तर आपण चांगले काम केले आहे. तरी देखील विरोधी पक्षावर आपले लक्ष राहिले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आमच्या मागण्यांकडे लक्ष देऊन आपण आमच्याकडे देखील लक्ष द्याल, अशी विनंती करत असल्याचे रोहित पाटील यांनी म्हटले आहे. माझ्या आयुष्यातली आमदारकीची पहिली शपथ मी हंगामी अध्यक्ष कोळंमकर यांच्या माध्यमातून घेतली आहे. त्याबद्दल त्यांचे देखील आभार रोहित पाटील यांनी मानले.

  

Share