रूपाली चाकणकर यांचा तोल सुटला:कारण त्यांनी प्रशासनात कधी कामच केलेले नाही, हगवणे प्रकरणावरुन रूपाली ठोंबरेंचा घरचा आहेर

पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणावरुन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर टीका केली जात आहे. तसेच त्यांच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. रूपाली चाकणकर यांनी वैष्णवीच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यावेळी काही सामाजिक संघटनांनी रूपाली चाकणकरांना अडवून महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत जाब विचारला होता. त्यानंतर, रूपाली चाकणकर यांनीही आता अति होतंय, असे म्हणत त्यांना फटाकरले. यानंतर रूपाली चाकणकरांना लक्ष केले जात आहे. यावरून आता त्यांच्या पक्षाच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी बोचरी टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी आपल्या पक्षातीलच महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकरांवर टीका केली. त्यांचा तोल सुटला कारण त्यांनी प्रशासनात कधी कामच केलेले नाही. त्या निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे, हे कशा पद्धतीने हँडल करायचं ही कमतरता दिसून आली, त्यामुळे हे दिसून आले, असे रूपाली ठोंबरे यांनी म्हटले आहे. …तर विरोधक गपगार झाले असते कस्पटे यांच्या घरी गेल्यानंतर विरोधकांना चिल्लर म्हणणे योग्य नाही. आज ते विरोधक आहेत, कधी आम्ही विरोधक होतो, तेव्हा आम्हीही सरकारला घेरायचो. त्यांनी प्रेस घेऊन सांगितले असते, त्यांनी केलेली कामे सांगितली असती तर विरोधक गपगार झाले असते. पण, विरोधकांना चिल्लर आणि शून्य किंमत अशी वक्तव्य संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने केल्यामुळे पुढील वाद वाढला, असेही ठोंबरे म्हणाल्या. विरोधकांकडून रूपाली चाकणकरांवर टीका वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर राज्यातील महिला आयोगाच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. आयोगाच्या कार्यपद्धतीत होत असलेली दिरंगाई, तसेच गंभीर प्रकरणातही घेतली जाणारी दुटप्पी भूमिका यावर समाजातून आणि राजकीय वर्तुळातूनही टीका होत आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चाकणकर यांच्या कामकाजावर ताशेरे ओढत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. काय आहे वैष्णवी हगवणे प्रकरण? वैष्णवी शशांक हगवणे (23) नामक तरुणीने सासरच्या मानसिक व शारिरीक त्रासाला कंटाळून 16 मे रोजी गळफास लावून आत्महत्या केली होती. वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांच्या तक्रारीनुसार, वैष्णवीच्या लग्नात 51 तोळे सोने, फॉर्च्युनर कार, चांदीची भांडी दिली होती. पण त्यानंतरही लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून शशांक व त्याच्या आई-वडिलांनी वैष्णवीचा छळ सुरू केला होता. त्यांनी तिच्या चारित्र्यावरही संशय व्यक्त केला होता. वैष्णवीच्या शवविच्छेदनात तिच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळलेत. दुसरीकडे, या प्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे, सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे व दीर सुशील राजेंद्र हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. राजेंद्र हगवणे हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे. पण आता त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.