ग्रामीण कला- उद्योग- खाद्य संस्कृतीचा माणदेशी महोत्सव परळमध्ये सुरू:महाराष्ट्राची संस्कृती सातासमुद्रापार पोहोचणार, आशिष शेलारांचा विश्वास
मुंबईच्या सांस्कृतिक क्षेत्रात निराळा ठसा उमटवणारा माणदेशी महोत्सव मोठ्या प्रमाणावर नरेपार्क सारख्या मोकळ्या जागेत भरतो आहे. या महोत्सवामुळे महाराष्ट्राची खासकरून माणदेशातील संस्कृती सातासमुद्रापार पोहोचणार आहे. माणदेशातील भगिनींची हे महत्कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी काढले. मुंबईतील परळच्या नरे पार्कमध्ये माणदेशी फाऊंडेशनचा ‘माणदेशी महोत्सव २०२५’ भरला आहे. या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, निवृत्त न्यायाधीश सत्यरंजन धर्माधिकारी, माणदेशी फाऊंडेशनच्या संस्थापिका चेतना गाला सिन्हा, भाजपाच्या महिला अध्यक्षा आमदार चित्रा वाघ, एचएसबीसी बॅंकेचे वरिष्ठ अधिकारी रोमीत सेन आदी मान्यवर उपस्थित होते. बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित माणदेशी फाऊंडेशन आयोजित “माण देशी महोत्सव २०२५” हा अस्सल मराठमोळ्या मातीचा महोत्सव ५ फेब्रुवारी पासून परळच्या नरे पार्कमध्ये रंगण्यास सुरुवात झाली. महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याचा शुभारंभ नंदीबैल, पिंगळा यांच्या सामूहिक सादरीकरणाने, धनगर बांधवांच्या गज्जी नृत्याने तसेच मंगळागौरीच्या खेळांनी झाला. माणदेशी महोत्सव २०२५ च्या निमित्ताने पुन्हा एकदा माण भागाशी जोडला गेलो. माझी बांधिलकी या भागाशी खूप जुनी आहे. भविष्यात माझ्याकडे मंत्रीपद असेल नसेल; पण तुमच्या या जयाभाऊचं माणदेशासोबतचं नातं कायमस्वरूपी राहणार आहे. कारण ते शाश्वत आहे, असा दृढनिर्धार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. लोक संस्कृतीचा, लोककलेचा आणि ग्रामीण महिलांना शहरी बाजारपेठ देण्याचा तसेच महिलांना स्वयंसिद्ध करण्याच्या माणदेशी फाऊंडेशनचा उद्देशाची मार्गक्रमणा योग्य दिशेने सुरू आहे. त्याचं फलित म्हणजे माणदेशी फाऊंडेशनने १० लाख महिलांच्या सक्षमीकरणाचा टप्पा गाठलेला आहे. आता माणदेशी फाऊंडेशनच्या माध्यमातून आम्हाला ग्रामीण लोककला, संस्कृतीला व्यापक प्रमाणात परदेशात पोहोचवायची आहे. त्या दिशेने आमची मार्गक्रमणा सुरू आहे, असं मत माणदेशी फाऊंडेशनच्या संस्थापिका चेतना गाला सिन्हा यांनी मांडले. २० वर्षांपूर्वीचा माण खटाव आता खूप बदलला आहे. त्याचं श्रेय गांधीवादी विचारांनी प्रेरीत असलेले कार्यकर्ते विजाभाई आणि चेतना ताईंना जातं. शहरातल्या या दोघांनी माणसारख्या भागातील कित्येकांचं आयुष्य उभं केलं. दुष्काळासारख्या प्रतिकूल परिस्थितीत नव्या उमेदीने कसं लढावं आणि उभं राहावं याचा आदर्श घेत शहरातील लोकांनी निराशा झटकली पाहिजे, असे मत निवृत्त न्यायाधीश सत्यरंजन धर्माधिकारी यांनी मांडलं. “व्यासपीठावर उभं राहून महिला सबलीकरण, सशक्तीकरणावर भाषण देणं चांगलं असतं; पण प्रत्यक्ष माण-खटावसारख्या भागात राहून चेतना गाला यांच्यासारखं कार्यरत राहणं कठीण आहे. माण भागाची प्रगती पाहता येत्या काही वर्षांत महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाल्यासारखा राहणार नाही, असा आशावाद आमदार चित्रा वाघ यांनी व्यक्त केला. या प्रसंगी माणदेशी फाऊंडेशनने १० लाख महिलांच्या सक्षमीकरणाचा टप्पा गाठल्याचे घोषित करण्यात आले. त्या निमित्ताने काही महिलांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. माण देशी महोत्सव २०२५’ च्या पहिल्या दिवसाला पाहुण्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. रुचकर भोजन दालन, हस्तकला प्रदर्शन व विक्री, कला कार्यशाळेस पाहुण्यांनी भेटी दिल्या. शेतकऱ्यांच्या उत्पादनांना पाहुण्यांचा सकारात्मक प्रतिसाद लाभला. महोत्सवात धनगरी गज्जी नृत्य आणि माणदेशी रेडीओच्या आरजे केराबाई आणि त्यांच्या टीमने गायलेल्या ओव्यांनी महोत्सवात रंग भरले. जागृती महिला मंडळाने सादर केलेल्या मंगळागौरीच्या पारंपारिक खेळांनी कार्यक्रम प्रेक्षणीय केला.