सदा सरवणकरांना घरात नो एन्ट्री:प्रचाराला आलेले पाहताच महिलेचा राग अनावर; प्रश्नांचा भडिमार करत दारातूनच पाठवले परत; VIDEO
सदा सरवणरकर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी माहीम मतदारसंघ पिंजून काढत आहेत नुकतेच ते कार्यकर्त्यांसह माहीम कोळीवाड्यात प्रचारासाठी गेले असता, त्यांना एका महिलेच्या रोषाला सामोरे जावे लागले. सदा सरवणकर घरासमोर येताच त्या महिलेचा राग अनावर झाला. तिने सरवणकरांवर प्रश्नांचा भडिमार करत आपला रोष व्यक्त केला. तसेच सदा सरवणकर यांना घरातही येऊ दिले नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. सदा सरवणकर प्रचारासाठी घरासमोर आल्यानंतर कोळी महिलेने माहीममधील कोळीवाडा येथील फिश फूड स्टॉल हटवल्यामुळे सदा सरवणकरांना जाब विचारला. सदा सरवणकरांनी लाडकी बहीण म्हणत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोळीवाड्यातील महिला चांगलीच संतापल्याचे दिसून आले. त्या महिलेने सदा सरवणकरांना घरातही येऊ दिले नाही. त्यामुळे सदा सरवणकरांना माघारी फिरावे लागले. नेमके काय घडले?
सदा सरवणकर प्रचारासाठी माहिममधील कोळीवाड्यात गेले होते. यावेळी ते एका कोळी महिलेशी संवाद साधण्यासाठी गेले असता त्या कोळी महिलेने आम्ही फूड स्टॉल लावत होतो, तो का बंद करायला लावला हे आधी सांगा. कधी चालू करणार? तुमच्या हातापाया पडून झाले. आमच्या पोटावर आले आहे. लाडकी बहीण सांगता मग आम्ही कुठली लाडकी बहीण आहोत, ते सांगा? असा प्रश्नांचा भडिमार सदा सरवणकरांवर केला. त्यावर आपण घरात बसून चर्चा करुया, असे सदा सरवणकर म्हणाले. मात्र, त्या महिलेने सदा सरवणकरांना घरात घेतले नाही. माहीम मतदारसंघात तिरंगी लढत
दरम्यान, मुंबईतील माहीम विधानसभेत शिवसेना विरुद्ध शिवसेना विरुद्ध मनसे अशी तिरंगी लढत होणार आहे. राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे याच मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे माहीम मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मुंबईतील हायव्होल्टेज लढत म्हणून या मतदारसंघाकडे पाहिजे जात आहे. माहीममधून अर्ज मागे घेण्यासाठी शिंदे गटाचे उमेदवार यांच्यावर खूप दबाव टाकण्यात आला होता. यासाठी महायुतीच्या दिग्गज नेत्यांसोबत बैठकाही झाल्या. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत हा ड्रामा सुरू होता. मात्र, सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले. माहीममध्ये अमित ठाकरे यांना सदा सरवणकर आणि ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांचे तगडे आव्हान असणार आहे. त्यामुळे अमित ठाकरे यांचा विधानसभेत जाण्याचा मार्ग खडतर असणार आहे.