समता सप्ताहामध्ये सुरू आहे संविधानाचा जागर:14 पर्यंत विविध कार्यक्रम; योजनांची माहिती देण्यावर भर

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी आणि जनजागृती व्हावी, या उद्देशाने जिल्ह्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाला ८ एप्रिलपासून सुरवात झाली असून हा सप्ताह १४ एप्रिल पर्यंत चालणार असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी स्पष्ट केले. सप्ताहादरम्यान भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन, वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा, पथनाट्ये, कार्यशाळा, मेळावे आणि व्याख्यानांचे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. शासकीय योजनांची माहिती जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे व सामाजिक समता व न्याय या मूल्यांना प्रोत्साहन देणे, हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. मागील दोन दिवसांत शाळा, महाविद्यालये व शासकीय वसतिगृहांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व, निबंध आणि लघुनाटिका स्पर्धा आयोजित केल्या होत्या. ११ एप्रिल रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली असून त्यांच्या सामाजिक कार्यावर व्याख्यान आयोजित केले जाणार आहे. सप्ताहामध्ये संविधान जागर या कार्यक्रमांतर्गत भारतीय संविधानाची निर्मिती, मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये यावर माहिती दिली जाईल. महिलांसाठी विशेष मेळावे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबिरे व मेळावेही आयोजित करण्यात आले आहेत. रविवारी १३ एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, शासकीय कार्यालये आणि अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. १४ एप्रिल रोजी सप्ताहाचा समारोप होईल. यानिमित्त, शासकीय कार्यालये, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात येईल. तसेच विविध व्याख्याने आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येईल. जिल्हा स्तरावर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान मेळावा आयोजित करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेतीविषयक कार्यांवर माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. समतादूतांद्वारे ग्रामीणसह शहरी भागांमध्ये पथनाट्ये आगामी दिवसांत समतादूतांद्वारे ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये पथनाट्ये आणि लघुनाटिकांच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या योजनांविषयी प्रबोधन केले जाईल. सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्यामार्फत मार्जिन मनी योजनेवर कार्यशाळा आणि लाभार्थी मेळावे देखील आयोजित केले जाणार आहेत.