अमरावती जिल्ह्यातील तरुणाचा पाकिस्तानमधील संघटनांशी संबंध:सलग तिसऱ्या दिवशी चौकशी; NIA ची टीम तळ ठोकून
शहरातील छायानगर परिसरातील रहिवासी मो. मुसैब शे. ईसा (23)याला ‘एनआयए’ने संशयाच्या आधारे 12 डिसेंबरला ताब्यात घेतले होते. 15 तासांच्या चौकशीअंती सायंकाळी सोडले होते. त्याचप्रमाणे शुक्रवारी सकाळी पुन्हा साडेनऊ वाजतापासून चौकशी सुरू करून रात्री साडेनऊ नंतर त्याला सोडून दिले. तसेच शनिवारी (दि.14)सकाळी चौकशीसाठी बोलावले आहे. या तरुणाचा पाकिस्तानातील संघटनांशी संबंध असल्याचा NIA ला संशय आहे. त्यामुळे NIA चे पथक गेल्या तिन दिवसांपासून अमरावतीमध्ये तळ ठोकून आहे. शुक्रवारी सकाळी मो. मुसैबला त्याच्या वडिलांनी स्वत: राजापेठ ठाण्यात सायकल रिक्षात बसवून आणले व ‘एनआयए’कडे चौकशीसाठी हजर केले. या वेळी मुसैबचे मामा सोबत होते. त्यानंतर ‘एनआयए’ने मुसैबवर असलेल्या संशयाच्या आधारे सखोल चौकशी सत्र सुरू केले. शुक्रवारी रात्रीपर्यंत ‘एनआयए’ निश्चितच निष्कर्षाप्रत पोहोचणार, अशी चर्चा सुरू होती. परंतु शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेपर्यंत चौकशी करून त्याला सोडण्यात आले. मो. मुसैब हा एका दहशतवादी संघटनेसोबत जोडला गेला असावा किंवा त्यांच्यासोबत सोशल मीडिया ग्रुपवर तो सहभागी असावा, असा संशय ‘एनआयए’ला आहे. त्याच संशयातून ही चौकशी सुरू आहे. अनेक महिने पैसे जमा करून घेतला मोबाइल मो. मुसैबची घरची परिस्थिती हलाखीची आहे. तो अत्तर विक्री करतो. त्यामधूनही त्याला फार पैसे मिळत नाही. दरम्यान त्याला स्मार्टफोन घ्यायचा होता, त्यासाठी त्याने अनेक महिने इतरांना थोडे, थोडेपैसे मागितले. अशा पद्धतीने जमा झालेल्या रकमेतून त्याने मोबाइल खरेदी केला असल्याचे मुसैबच्या मामाने सांगितले. गुरुवारी रात्री कोणासोबतच मोकळा बोलला नाही गुरुवारी सायंकाळी ‘एनआयए’ने चौकशी करून मो. मुसैबला घरी सोडले. गुरुवारच्या रात्री तो घरीही कोणासोबतच चौकशीच्या विषयावर काहीच बोलला नाही. त्याच्या सोबत आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र तो बोलत नव्हता, असे मौ. मुसैबचे वडील शे. ईसा यांनी सांगितले आहे.