संघाचा किंवा भाजपचा प्रमुख मुस्लिम असेल का?:विजय वडेट्टीवार यांचा सवाल; देवालाही राजकारणात ओढले जात असल्याचा आरोप

काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष मुस्लिम असेल का? या भाजपच्या प्रश्नावर काँग्रेसचे नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी पलटवार केला आहे. आमच्या प्रश्नाचा अध्यक्ष मुस्लिम असेल का? असा प्रश्न विचारला जात असेल तर मी देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा किंवा भाजपचा मुस्लिम प्रमुख असेल का? असा प्रश्न विचारु शकतो. असे म्हणत वडेट्टीवार यांनी भाजपवर पलटवार केला आहे. या संदर्भात काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, “… देश भाजपच्या राजकारणावर लक्ष ठेवून आहे. जर ते आम्हाला विचारत असतील की, काँग्रेसमध्ये मुस्लिम अध्यक्ष असेल का, तर मी त्यांना विचारू इच्छितो की, त्यांच्याकडे कधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा किंवा भाजपचा मुस्लिम प्रमुख असेल का?” कोणत्याही धर्मा संदर्भात पंतप्रधानांनी टिप्पणी करू नये, हीच त्यांच्याकडून अपेक्षा आहे. त्यांनी विचारले असे काही प्रश्न नसतात. अशा पद्धतीचे चर्चा करणे हे चुकीचे आहे. कोणत्याही धर्माबद्दल अशा प्रकारची टिप्पणी करणे, हे बरोबर नाही, असे मला वाटते. असे देखील विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. देवालाही राजकारणात ओढले जातेय देवाला देखील राजकारणात आणले तर देव मंदिरामध्ये राहणार नाही. देवाची जागा ही मंदिरापेक्षा आपल्या हृदयात, भावनेत आणि श्रद्धेत असायला हवी. मात्र आता भगवंता सोबत देखील खेळ चालू असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. देवा संदर्भात देखील राजकारण होत असेल तर देव मंदिरात देखील दिसणार नाही. वास्तविक ते काय म्हणाले, त्याचा अर्थ नेमका काय? हे मला माहित नाही. त्यामुळे मी याविषयी टिप्पणी करणार नाही. मात्र, देवाचे नाव घेऊन भ्रष्ट राजकारण सुरू असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. मोदींना मुस्लिमांचे भले करण्यापासून कोणी रोखले? मुस्लिम समाजाचा फायदा करण्याचा काँग्रेसने कधीही प्रयत्न केला नाही, असा आरोप मोदींनी केला होता. मात्र, एकही मुस्लिम मंत्री नसलेल्या पंतप्रधानांना हे बोलण्याचा अधिकार नसल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. आम्ही केले नाही तर तुम्ही करून दाखवा, तुम्हाला कोणी थांबवले? असा प्रतिप्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

  

Share