सांगलीत 4 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार:खून करून घरातील पेटीत ठेवले लपवून, नराधमाच्या आवळल्या मुसक्या
सांगलीच्या जत तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जत तालुक्यातील एका 4 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करत हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे नराधम आरोपीने या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा मृतदेह घरातीलच एका पेटीमध्ये लपवून ठेवला होता. पोलिसांनी तपास करत ही बाब उघडकीस आणली असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील करजगे गावात एका 4 वर्षीय बालिकेचा खून झाल्याची घटना उघडकीस आली होती. शवविच्छेदनाच्या अहवालातून हा खून बलात्कार करून झाला असल्याचा संशय आला होता. त्यानुसार पोलिसांनी चक्रे फिरवत तपास सुरू केला होता. गुरुवारी आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार गावात सर्वत्र शोधाशोध सुरू झाली होती. पोलिस देखील गावात शोध मोहीम राबवत होते. यावेळी आरोपी पांडुरंग कळळी-पुजारी हा गावात संशयितरित्या फिरत होता. पोलिसांना ही बाब लक्षात आली. पोलिसांनी आरोपी पांडुरंग कळळी पुजारी याच्या घराचा तपास करण्यास गेले असता घरातील एका पत्र्याच्या पेटीत चार वर्षीय चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी हिसका दाखवताच आरोपीने गुन्हा कबूल केला. विशेष बाब म्हणजे हा आरोपी मृत चिमुकलीच्या शेजारीच राहत होता. ही घटना उघडकीस आल्यावर गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट दिसून आली. दरम्यान, बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढतच जात असल्याचे दिसत आहे. बदलापूरची घटना अद्यापही कोणी विसरू शकलेले नाही. त्यानंतर देखील अनेक घटना उघडकीस येतच आहेत. अशा घटना घडल्या की लोक रस्त्यावर उतरतात, मात्र नंतर काय? घटना घडणाऱ्या घडतच असल्याचे दिसत आहे. यावर शासनाने व पोलिस यंत्रणेने ठोस पाऊले उचलने अत्यंत गरजेचे झाले आहे.