संग्राम थोपटेंनी दुषणे देत भाजप संगतीचे दर्शन घडवले:काँग्रेसचे गोपाळ तिवारी यांची टीका, म्हणाले – पक्षाने अन्याय केल्याचा आरोप करणे तथ्यहीन

संग्राम थोपटेंनी दुषणे देत भाजप संगतीचे दर्शन घडवले:काँग्रेसचे गोपाळ तिवारी यांची टीका, म्हणाले – पक्षाने अन्याय केल्याचा आरोप करणे तथ्यहीन

भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपात प्रवेश करताक्षणी काँग्रेस बदनामीचा अजेंडा राबवणे सुरु केले व भाजप संगतीचेच दर्शन घडवले असल्याची टीका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली. ते म्हणाले की, ५० वर्षे घरांत सत्ता नांदवणाऱ्या व संस्थांचे जाळे ऊभे करणाऱ्या काँग्रेस पक्षास थोपटे यांनी दुषणे देत, पक्षाप्रती अखेर कृतघ्नतेची पावती दिली हा भाजपच्या संगत व संस्कारांचा परीचय करून दिला. ही बाब जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या व मतदारांच्या जिव्हारी लागली असल्याचे सांगून थोपटे यांनी काँग्रेसवर केलेल्या निराधार व तथ्यहीन टीकेचा समाचार घेतला. आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्तिगत स्वार्थासाठी आपल्या विचारसरणीचा त्याग करून सत्ताधारी पक्षाशी हात मिळवणी केली आहे. त्यांनी व्यक्तिशः कुठल्या पक्षाबरोबर राहावे हा आमचा मुद्दा नसला तरी देखील काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर अन्याय केल्याचा आरोप करणे तथ्यहीन व चुकीचेच असल्याचे सांगीतले. काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत गोपाळ तिवारी बोलत होते. यावेळी सूर्यकांत ऊर्फ बाळासाहेब मारणे, मुळशी तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश आण्णा पारखी, उपाध्यक्ष मोहन झुंजुरके, युवक काँग्रेसचे कुमार शेडगे, अशोक मातेरे, मधुसूदन पाडाळे (सेवादल), मामा खोले, भोला वांजळे, धनंजय भिलारे, गणेश शिंदे इ कार्यकर्ते उपस्थित होते. पुढे बोलताना तिवारी म्हणाले, पक्षात सक्रिय असलेल्या प्रत्येक कुटुंबाचे काँग्रेस पक्षासाठी मोठे योगदान आहे. पन्नासहून अधिक वर्षे त्यांच्या घराण्यांकडे सत्ता होती.भोर मधील विविध शिक्षण संस्था, शाळा – महाविद्यालये, दुध उत्पादक संस्था, वाहतुक संस्था, राजगड साखर कारखाना अशा अनेक संस्था उभ्या करण्यात काँग्रेस सत्ताकाळात मिळालेले पक्षीय सहकाऱ्याचे बळ हे काँग्रेस पक्षाचे योगदान नाही काय..? असा सवाल ही उपस्थित काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी केला. आज त्यातील काही संस्था अडचणीत आल्या असतील आणि त्यांना वाचवण्यासाठी म्हणून त्यांनी पक्ष सोडला असेल तर तो त्यांचा व्यक्तिगत स्वार्थ आहे. मात्र पक्षांवर तोंडसुख घेणे व दूषणे देणे निषेधार्य आहे, अशी प्रतिक्रिया ही मुळशीच्या काँग्रेसजनांनी या प्रसंगी दिली. संग्राम थोपटे यांनी विचारसरणीचा त्याग करून पक्षांतर केले असले तरी देखील भोर, वेल्हा, मुळशी तालुक्यात सर्वसमावेशक राष्ट्रीय विचारांचा प्रभाव कायम आहे. त्यामुळे या तालुक्यातील मतदार व काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते थोपटे यांच्या मागे न जाता कॉँग्रेस पक्षा सोबतच कायम राहतील, असा विश्वासही या प्रसंगी उपस्थित मुळशी तालुका काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिला. दरम्यान, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत काँग्रेस पक्षाने आणि अन्य विरोधी पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली असल्याचे सांगितले. केंद्र सरकार याबाबत जी तत्पर व खंबीरपणे भूमिका घेईल त्याला पाठिंबा देण्याचे विरोधकांनी स्पष्ट केले आहे. ही हल्ल्याची घटना मोदी सरकारने गांभीर्याने घेऊन, वल्गना केल्या प्रमाणे पाकिस्तानवर तातडीने कठोर कारवाई करावी, असे आवाहन देखील तिवारी यांनी केले.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment