भाजपचे राज्यात ‘ऑपरेशन लोटस’ नव्हे तर ‘ऑपरेशन डर’:अदानींना आता जकात नाकेही चालवायचे आहेत का? संजय राऊतांचा सवाल
महाराष्ट्रामध्ये भाजप ऑपरेशन लोटस राबवणार असल्याची चर्चा सध्या सुरु झाली आहे. यावरुन उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. महाराष्ट्रात भाजप ‘ऑपरेशन लोटस’ नव्हे तर ‘ऑपरेशन डर’ राबवते असा आरोप त्यांनी केला आहे. राज्यात गृह खाते कोणाकडे? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. संसदेमध्ये विरोधक बोलण्यासाठी उभे राहिले, त्यांचा मुद्दा मांडण्यासाठी उभे राहिले, तरी त्यांना बोलू दिले जात नसल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संसदेचे सभागृह हे चर्चेचे ठिकाण आहे. या ठिकाणी चर्चा व्हावी, मग ते विरोधी पक्षाने मांडलेले मुद्दे असो किंवा सत्ताधारी पक्षाने उपस्थित केलेले मुद्दे, चर्चा झाली पाहिजे. मात्र संसदेमध्ये सत्ताधारी पक्षच गोंधळ घालत असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. अदानी यांच्यावर अमेरिकेत खटला दाखल झाला आहे. त्यावर आम्हाला बोलू दिले जात नसल्याचे देखील राऊत यांनी म्हटले आहे. राज्यसभेच्या सभापतींविरोधात आता अविश्वास ठराव आणला जात आहे. तो मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. या पदावर बसलेली व्यक्ती काही दिवसांपासून पक्षपातीपणे वागत असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. त्यामुळे आमच्यासमोर अविश्वास ठराव आणल्याशिवाय कोणताच पर्याय दिसत नसल्याचे राऊत यांनी यांनी म्हटले आहे. गौतम अदानींवरुन निशाणा संपूर्ण महाराष्ट्र अदानी यांच्या घशात घालण्यासाठी राज्यातले सरकार हे गैरमार्गाने विजयी करण्यात आले असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. अदानी सारख्या एवढ्या मोठ्या उद्योगपतीला आता जकात नाका देखील चालवायचा असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. यामुळे ते आता कोणत्या स्तरापर्यंत राज्याला लुटण्यासाठी उतरले आहेत, असा आरोप राऊत यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांना गौतम अदानी भेटले आणि त्यानंतरच काहीतरी लुटण्याचा प्रकार होईल? अशी शंका आम्हाला वाटली होती. त्यानंतर जकात नाक्याचे प्रकरण समोर आले असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. अदानींना राज्य लुटता यावे, त्यामुळेच गैरमार्गाने सत्ता स्थापन केली असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. ‘ऑपरेशन लोटस’ नव्हे तर ‘ऑपरेशन डर’ भारतीय जनता पक्ष कोणतेही प्रकारचे ऑपरेशन करू शकते. कारण त्यांच्याकडे पैसे आहेत आणि यंत्रणा आहे. यापूर्वी देखील त्यांनी असे केले आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार सारखे नेते देखील भीतीमुळेच पळून गेले. ते ‘ऑपरेशन लोटस’ नव्हे तर ‘ऑपरेशन डर’ होते असा आरोप देखील राऊत यांनी केला आहे. पक्षासोबत आल्यानंतर त्यांच्यावरील केस मागे घ्यायच्या, त्यांची जप्त केलेली संपत्ती परत द्यायची, असेच काम भाजप करत असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस संदर्भातल्या चर्चेवर संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली. राज्यात गृह खाते कोणाकडे? वीस दिवसानंतर देखील राज्यात गृह खाते कोणाकडे? हे कळत नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे उध्वस्त झाली आहे. बीड जिल्ह्यातील केज मधील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्या झाली आहे. त्यानंतर पुण्यामध्ये देखील आमदारांच्या मामाचा खून झाला आहे. भारतीय जनता पक्षाचे पराभूत झालेले आमदार ज्या पद्धतीने धमक्या देत आहेत, ती भाषा गुंडांना देखील शरमेने मान घालावी लागणारी असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. इतक्या दिवसानंतर देखील गृहमंत्री ठरत नाही यावरून राऊत यांनी सत्ताधारी पक्षांवर निशाणा साधला. हे फडणवीस यांना शोभते का? शरद पवार यांच्या विषयी जी भाषा भाजपचे नेते वापरत आहेत, ती भाषा देवेंद्र फडणवीस यांना शोभते का? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. गोपीचंद पडळकर यांच्या विधानावरून राऊत यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. टिल्लू गब्बरसिंग म्हणत राऊत यांनी राणे कुटुंबावर देखील टीका केली. पडळकर वापर असलेल्या भाषेला फडणवीस यांचे समर्थन असल्याचे त्यांनी आधी जाहीर करावे, असे आव्हान देखील राऊत यांनी दिले आहे.