संकटाच्या काळात आम्ही सरकारच्या पाठीशी:संजय राऊत म्हणाले- अशा वेळी इंदिरा गांधींची आठवण येते; विशेष अधिवेशन घेण्याची मागणी

देशावरील असलेल्या या संकटाच्या काळात आम्ही केंद्र सरकारच्या पाठीशी असल्याचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. जो काही निर्णय घ्यायचा तो सरकारच घेत असते. मात्र आम्ही त्यांच्या पाठीशी असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. सर्व पक्षीय बैठकीत देखील हाच सूर असतो. मात्र, या काळात विरोधी पक्षाने दिलेल्या सूचनांचे पालन देखील सरकारने करावे, असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे. देशात इतर अनेक विषयांवर एक किंवा दोन दिवसांवर अधिवेशन बोलावले जाते. त्याच पद्धतीने काश्मीरच्या प्रश्नावर देखील दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावायला हरकत नाही, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यामध्ये विरोधकांच्या सूचना किंवा एकंदरीत राष्ट्राची भावना त्यावर चर्चा घडवून देशाच्या सर्वच पक्ष्यांच्या नेत्यांना त्या ठिकाणी बोलण्याची संधी मिळायला हवी, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. काश्मीर आणि मणिपूर हे अत्यंत धगधगते प्रश्न आहेत. या प्रश्नावर आम्हाला बोलू दिले पाहिजे. संविधानावरील अधिवेशनातील चर्चे दरम्यान काश्मीरवर बोलण्यास फार कमी वेळ मिळाला. या विषयावर हिंदू – मुसलमान राजकारण करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. मात्र तो यशस्वी झाला नाही. त्याबद्दल देशवासीयांचे आभार मानायला हवे. मात्र या सर्व विषयावर संसदेमध्ये चर्चा झाली तर त्यामुळे सरकारला चांगली दिशा मिळेल, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. राष्ट्र म्हणून आमच्या भावना आणि संवेदना या सरकार सोबत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने सर्व पक्षीय बैठकीला कोण जाणार? याचा निर्णय अद्याप झालेला नसल्याची माहिती त्यांनी दिली. अरविंद सावंत हे एका मीटिंगसाठी बाहेर गेलेले आहेत. मात्र मी अशा मिटिंगला जात नाही. मी फार आक्रमक बोलतो. त्यामुळे मी अशा बैठकांना जाणे टाळतो. मात्र, आमचा प्रतिनिधी नक्कीच उपस्थित राहील. एक राष्ट्र म्हणून आमच्या भावना आणि संवेदना या सरकार सोबत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. इंदिरा गांधी यांची आठवण येते या प्रसंगी आम्हाला इंदिरा गांधी यांनी आठवण येत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 1971 मध्ये ज्या पद्धतीने त्यांनी प्रसंग हाताळला आणि पाकिस्तानचे दोन तुकडे केले. यातून त्यांनी पाकिस्तानला कायमची अद्दल घडवली. त्यामुळे आता आम्हाला इंदिरा गांधींची आठवण येत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. यातून सरकारवर दुबळेपणाचा आरोप करत आहात का? असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला होता. यावर सरकार जर दुबळे असेल तर त्यांच्या पाठीशी उभे राहुल आम्ही त्यांना ताकद देऊ, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. हा हल्ला केवळ काश्मीर किंवा पर्यटकांवर नाही तर हा देशावरील हल्ला असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.