संतोष देशमुख खून प्रकरण:SIT चौकशी करा, धनंजय मुंडेंना चौकशी होईपर्यंत मंत्रिमंडळात घेऊ नका, मराठा क्रांती मोर्चाची मागणी
केज तालुक्यातील मस्सजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निघृण खून करण्यात आला आहे. यात पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. तसेच धनंजय मुंडे यांच्यावरही थेट संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य ओळखून सरकारने खुनाचा छडा लावण्यासाठी त्वरीत एसआयटी नियुक्त करावी. तसेच जोपर्यंत चौकशी होत नाही तोवर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान देऊ नये, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन विभागीय आयुक्तांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे. यासंबंधीच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सरपंच संतोष देशमुख यांचा खून राजकीय द्वेषापोटी करण्यात आला आहे. धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आरोपी निघाले आहेत. त्यामुळे मुंडे यांचा या प्रकरणात हात असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. तशी चर्चा संपूर्ण बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील सुरू आहे. त्यामुळे माजी मंत्री धनंजय मुंडे यांना एसआयटी चौकशी पूर्ण होईपर्यंत मंत्रिमंडळात स्थान देऊ नये. अन्यथा महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या रोषाला राज्य सरकारला सामोरे जावे लागेल. यांची गांभीर्याने दखल घ्यावी. धनंजय मुंडे यांचा हस्तक कुख्यात गुंड वाल्मिक कराड यास मुख्य आरोपी करण्यात यावे, अशी मागणी देखील मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. गुरूवारी विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस महासंचालक यांना हे निवेदन पाठवण्यात आले आहे. रवींद्र काळे पाटील, विकीराजे पाटील, नितीन कदम, ॲड सुवर्ण मोहिते, अमोल सोळुंके आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.