संतोष देशमुख हत्या प्रकरण:बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात आज तिसरी सुनावणी; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम दाखल

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात तिसरी सुनावणी होणार आहे. आरोपींवर चार्ज फ्रेम करण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हजर राहून न्यायालयाकडे विनंती अर्ज दाखल करणार करणार आहेत. त्यासाठी निकम हे कालच बीडमध्ये दाखल झाले आहेत. सरपंच देशमुख हत्या प्रकरणात 26 मार्चला झालेल्या दुसऱ्या सुनावणीत बीड जिल्हा सत्र न्यायालयात ॲड. निकम यांनी न्यायालयाने आरोपीवर चार्ज फ्रेम करावा याबाबत तिसऱ्या सुनावणीत विनंती अर्ज देणार असल्याचे सांगितले होते. आरोपींपैकी वाल्मीक कराड, महेश केदार, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, सुधीर सांगळे हे 6 आरोपी बीड जिल्हा कारागृहातील न्यायालयीन कोठडीत आहेत, तर कृष्णा आंधळे हा फरार आहे. आरोपी विष्णू चाटे हा सध्या लातूरच्या कारागृहात आहे. 15 व्हिडिओ अन् 8 फोटो समोर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 15 व्हिडिओ आणि 8 फोटोबद्दल माहिती समोर आली आहे. आरोपी महेश केदारने स्वतःच्या मोबाईलमध्ये सरपंच देशमुख यांना मारहाण करताना 8 फोटो आणि 15 व्हिडिओ रेकॉर्ड केले. यात सुदर्शन घुलेने छातीवर उडी मारल्यानंतर देशमुखांनी रक्ताची उलटी केल्याचे समोर आले आहे. घटनेच्या दिवशी 9 डिसेंबरला 3 वाजून 46 मिनिटांनी आरोपींनी मारहाण करायला सुरुवात केली होती, तर शेवटचा व्हिडिओ हा 5 वाजून 53 मिनिटांचा आहे. त्यानंतर काही वेळाने देशमुख यांचा मृत्यू झाला. आरोपींनी देशमुखांना 2 तास 7 मिनिटे म्हणजे 127 मिनिटे मारहाण केल्याचे स्पष्ट होते. छातीवर उडी मारल्यानंतर रक्ताची उलटी सरपंच संतोष देशमुख यांना काळ्या कारमधून खाली खेचत त्यांच्या अंगावरील कपडे काढत त्यांना लाकडी काठी, पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकचा पाईप, क्लच वायर, गॅस पाईप अशा हत्यारांनी 2 तास जबर मारहाण करण्यात आल्याचे दिसून येत आहे. यात प्रतीक घुलेने देशमुख यांच्या छातीवर उडी मारली. त्यानंतर संतोष देशमुख यांनी रक्ताची उलटी केली. तर शेवटच्या व्हिडिओत संतोष देशमुख यांचा विव्हळताना एकदम लहान आवाज येत आहे. कारमध्ये आढळले बोटांचे 99 ठसे दुसरीकडे, संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी निर्घृण हत्या झाली होती. तत्पूर्वी सुदर्शन घुले व त्याच्या सहकाऱ्यांनी त्यांचे काळ्या रंगाच्या (एमएच 44 झेड 9333) एका स्कॉर्पिओमधून अपहरण केले होते. न्यायवैद्यक पथकाने या कारची बारकाईने तपासणी केली. त्यात त्यांना कारमध्ये बोटांचे जवळपास 99 ठसे आढळले. यापैकी काही ठसे हे सुधीर सांगळे याच्या हाताच्या ठशांशी जुळले आहेत. पण इतर आरोपींच्या बोटांचे ठसेही स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या ठशांशी जुळले आहेत का? हे समजू शकले नाही. पण या कारमधून पोलिसांनी अनेक गोष्टी जप्त केल्या आहेत. त्यामुळे ही कारही संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे. खटल्याचा घटनाक्रम पहिली सुनावणी : केज येथील जिल्हा व सत्र न्यायालयात 12 मार्चला पहिली सुनावणी झाली. बचाव पक्षाने डिजिटल पुरावे, सीडीआर, आरोपींचे जबाब देण्याची मागणी केली होती. त्यावर सरकारी वकिलांनी पुढील सुनावणीत पुरावे देऊ असे सांगितले. दुसरी सुनावणी : 26 मार्चला ॲड. उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद करत कराड याने इतर आरोपींना गाइड केल्याचे सांगितले. कराडचे वकील विकास खाडे यांनी सीडीआर, फुटेज, कागदपत्रांची मागणी केली. त्यानुसार कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचे निर्देश न्यायाधीशांनी दिले.