संतोष जगदाळे यांचा मृतदेह घरी आल्यानंतर पत्नीला अश्रू अनावर:86 वर्षांच्या वृद्ध आईला काश्मीरला जाण्यापूर्वी भेटून निघाले होते

पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले संतोष जगदाळे यांचे पार्थिव पुण्यात दाखल झाले आहे. संतोष जगदाळे हे त्यांच्या 86 वर्षांच्या वृद्ध आईला काश्मीरला जाण्यापूर्वी भेटून निघाले होते. मी काश्मीरला फिरायला जातोय, लवकर परत येईल, असे त्यांनी आईला सांगितले होते. मात्र जगदाळे यांचा मृतदेह घरी आल्यानंतर त्यांच्या पत्नीला अश्रू अनावर झाले. त्यांच्या पत्नी धाय मोकलून रडत होत्या. काश्मीर मधील पहलगाम परिसरात दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील देखील सहा पर्यटकांचा समावेश आहे. त्यातील पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे या दोघांचा मृतदेह सकाळी पुण्यात दाखल झाला. त्यानंतर त्यांचा मृतदेह त्यांच्या घरी अंतिम दर्शनासाठी नेण्यात आला. या वेळी घरातील सर्व नातेवाईकांना शोक अनावर झाला होता. जगदाळे यांना अंतिम निरोप देण्यासाठी पुण्यातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. शरद पवार यांनी केले सांत्वन दरम्यान राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार हे कर्वे नगर येथे जगदाळे कुटुंबाला भेटण्यासाठी दाखल झाले होते. त्यांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. शरद पवार यांच्यासमोर जगदाळे कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. कौस्तुभ गणबोटे यांच्या निवासस्थानी ही त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचलेल्यांना अश्रू अनावर झाले. पुणे एअरपोर्टवर गुरुवारी पहाटे गणबोटे आणि जगदाळे यांचे पार्थिव नेण्यासाठी रुग्णवाहिका पोहचल्या त्यावेळी मंत्री माधुरी मिसाळ आणि मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. दाेघांत गेल्या 25 वर्षांपासून मैत्री पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात पुण्यातील संताेष जगदाळे आणि काैस्तुभ गनबाेटे या दाेघांना त्यांच्या कुटुंबीयांच्या डाेळ्यासमाेर अतिरेक्यांनी गाेळ्या घालून ठार केले. या दाेघांत गेल्या 25 वर्षांपासून मैत्री हाेती आणि फरसाणच्या व्यवसायाच्या निमित्ताने त्यांच्यात अधिक जवळीक निर्माण झाली हाेती. हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या मैत्रीचा करुण शेवटही एकत्रच झाला. जगदाळेंचे एकुलत्या एक एमबीए झालेल्या उच्चशिक्षित मुलीच्या लग्नाचे, तर गनबाेटे यांचे नातवाचे बारसे करण्याचे स्वप्न अधुरे राहिले असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.