सरकारच्या आश्वासनामुळे महिलांनी मतदान केले:त्यामुळे पुढच्या बजेटआधी लाडक्या बहिणींचे पैसे द्यावेत, रामदास आठवलेंचा सरकारला सल्ला

महायुतीने विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनामुळे राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु, यंदाच्या अर्थसंकल्पात त्याबाबत कोणतीही घोषणा न झाल्याने लाडक्या बहिणींची निराशा झाली आहे. 2100 रुपये न देण्यावरून विरोधकांकडून सरकारवर निशाणा साधला जात आहे. अशात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या योजनेवर मोठे भाष्य केले आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणे अवघड आहे. मात्र, पुढच्या बजेटआधी लाडक्या बहिणींचे पैसे द्यावेत, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. रामदास आठवले आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह औरंगजेबाची कबर आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूवरही भाष्य केले. सरकारच्या आश्वासनामुळेच महिलांनी मतदान केले लाडकी बहीण योजनेवर बोलताना रामदास आठवले म्हणाले की, लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणे अवघड जात आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनामुळे महिलांनी मतदान केले आहे. पुढच्या बजेटआधी लाडक्या बहिणींचे पैसे द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. कबर हटवण्याच्या मागणीला आमचा पाठिंबा नाही औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरून नुकताच नागपूरमध्ये मोठा हिंसाचार उसळला होता. यावरही रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली. औरंगजेब हा चांगला प्रशासक म्हणणे चुकीचे आहे. औरंगजेबाचा विनाकारण हा विषय काढू नये. कबर हटवण्याच्या मागणीला आमचा पाठिंबा नाही. छत्रपती संभाजी महाराजांनी जबरदस्त कर्तृत्व निर्माण केले आहे. औरंगजेबाची कबर हटवू नका, मात्र छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक असावे, असे रामदास आठवले म्हणाले. आपली औलाद औरंगजेबाची नाही नागपूर येथे पूर्वनियोजन करून दंगल घडवली. दंगल करणाऱ्यांना कठोर कारवाई करावी. हिंदूंना सांगतो की शांत राहा. विनाकारण वाद निर्माण करू नका. मुस्लिमांना सांगतो आपली औलाद औरंगजेबाची नाही. आपले नाते औरंगजेबाशी जोडू नये, असेही ते म्हणाले. सरकारने खासगी क्षेत्रात आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्युवरही भाष्य केले. सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाली. दलितांकडे कमी लक्ष दिले जात आहे. राज्य सरकारने खासगी क्षेत्रात आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा. भाऊराव पाटील यांनी कमावा आणि शिका योजना सुरु केली. तशीच योजना सुरु करून महिना 5-10 हजार रुपये द्यावेत, अशी मागणी आठवले यांनी केली. महाबोधी विहाराच्या वादावर बोलताना आठवले म्हणाले, ‘गया येथील बौद्ध विहार आमच्या ताब्यात द्या. मी स्वत: बौद्ध गया येथे जाणार आहे. आताचे ट्रस्टी रद्द करा. बौद्ध धर्माच्या ट्रस्टमध्ये इतरांना घेऊ नये. हे ही वाचा… सध्या आमची आर्थिक परिस्थिती नाही:पण ती सुधारल्यानंतर 2100 रुपये देऊ, लाडकी बहीण योजनेवर अजित पवार स्पष्टच बोलले उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर सभागृहात निवदेन दिले. सध्या आमची परिस्थिती नाही, पण आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही बहिणींना 2100 रुपये असे अजित पवार म्हणाले. सगळे सोंग करता येते, पण पैशाचे सोंग करता येत नाही. पैसे देणार नाही असे आम्ही म्हटलेले नाही. पण एकंदरीतच आर्थिक परिस्थिती बघून आम्ही ते देऊ, असे ते म्हणाले. पूर्ण बातमी वाचा…