‘सर्वोदय‘च्या स्काउट-गाइड्सकडून 12 किमी सायकल रॅलीद्वारे जागृती:वृक्षलागवड, संवर्धन अन् पाणी बचतीचा दिला संदेश

येथील स्काऊट-गाईडच्या विद्यार्थ्यांनी १२ कि.मी. सायकल रॅली द्वारे वृक्ष लागवड, पाणी बचतीचा संदेश देत नांदरखेडा फार्महाऊस वर पोहोचले. सर्वोदय विद्या मंदिर विद्यालयाचे विद्यार्थ्यांनी निसर्ग शिबिराचा आनंद घेत शिक्षकांकडून वृक्ष संवर्धनासह निसर्गाबाबत माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी स्काऊट आणि गाईड या विषयांतर्गत प्रकाशा येथील सर्वोदय विद्या मंदिर विद्यालयाचा विद्यार्थ्यांनी प्रकाशा ते नांदरखेडा असा २० कि.मी. परतीचा प्रवास सायकलने केला. प्राचार्य एस.एस. पाटील, उपमुख्याध्यापक डी.टी. चौधरी, पर्यवेक्षक भालचंद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्काऊट प्रमुख नरेंद्र गुरव यांनी शिबिर सहलीचे आयोजन केले. मंगळवारी (दि.२५) सकाळी ८ वाजता शाळेच्या गेटजवळ शिक्षण विस्तार अधिकारी डी.डी. राजपूत, सुनील तायडे यांनी विद्यार्थ्यांच्या सायकल रॅलीला हिरवी झेंडी दाखवली. सायकल रॅली गावातून नांदरखेडा येथील संस्थेचे चेअरमन मोतीलाल पाटील यांच्या वनश्री फार्म हाऊसवर पोहोचली. वनराईत असलेले सीताफळ, रामफळ, चिकू, आंबे, बांबू अन् नारळाची झाडे, बांबूपासून तयार केलेल्या झोपड्या आणि पूल या सर्वांची माहिती जाणून घेतली. नारळाच्या सुकलेल्या फांद्यांपासून खराटा केला तयार फार्म हाऊसवर एक स्तुत्य उपक्रम राबवला. नारळाचा झाडाच्या सुकलेल्या फांद्यांपासून खराटा तयार करण्याचे प्रात्यक्षिक गाईड शिक्षिका सुनीता पाटील, ज्योती सोनवणे यांनी गाइड्सना दाखवले. तेथील निसर्गाची माहिती एस.एम. गावित, संजय मकवाना, वैकुंठ पाटील यांनी दिली. संस्थेचे चेअरमन मोतीलाल पाटील यांनीही या शिबिराला भेट दिली.