साळवा फाटा येथे पोलिस असल्याची बतावणी करून वृध्दास लुटले:45 हजाराचा ऐवज पळविला; आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

कळमनुरी तालुक्यातील साळवा फाटा येथे या भागात खून झाला आहे, तुम्ही कसे काय फिरत आहात, आम्ही पोलिस आहोत, सर्वांची तपासणी केली जात अाहे. तुमच्या जवळ जे आहे ते काढून द्या असे म्हणत तोतया पोलिसांनी वृध्दाला लुटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात रविवारी ता. ९ रात्री गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील परजना येथील फालाजी कऱ्हाळे हे त्यांच्या सहकाऱ्यासोबत कळमनुरी तालुक्यातील नरवाडी येथे त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी रविवारी ता. ९ सकाळी आले होते. दुपारच्या वेळी ते परत गावाकडे जाण्यासाठी ते साळवा फाटा येथे बसची वाट पाहात उभे होते. यावेळी त्यांच्या सोबत असलेले सहकारी बाजूला लघुशंकेला गेले होते. दरम्यान, फालाजी हे एकटेच असल्याचा गैरफायदा घेत दुचाकीवर दोघे जण त्यांच्या जवळ आले. आम्ही पोलिस असून या भागात खून झाला आहे, तुम्ही इकडे कसे काय फिरत आहात अशी विचारणा करून आम्हाला तुमची तपासणी करायची आहे असे सांगितले. अचानक पोलिस आल्याचे पाहून फालाजी देखील घाबरून गेले. यावेळी तोतया पोलिसांनी त्यांच्या तपासणी करण्याच्या बहाण्याने त्यांच्या हातातील अंगठी व पाच हजार रुपये रोख असा ४५ हजाराचा मुद्देमाल घेऊन त्यांनी पळ काढला. सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरु आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फालाजी यांनी थेट आखाडा बाळापूर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, उपनिरीक्षक गणेश घोटके, जमादार राजेश घोंगडे, शेख अन्सार यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.