शहाजी बापू पाटलांच्या कृतीने वेधले सर्वांचे लक्ष:भाषण करताना भर सभेत स्वतःच्याच तोंडात मारले, नेमके काय घडले?

शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी आमदार शहाजी बापू पाटील हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शहाजी बापू पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलत असताना भरसभेत स्वतःच्याच तोंडात मारून घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शहाजी बापू पाटील हे त्यांच्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांच्या कृतीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. माजी आमदार शहाजी बापू पाटील हे सांगोल्यातील पाण्याच्या मुद्द्यावर बोलत असताना भर सभेत स्वतःच्याच तोंडात मारून घेतले. त्यांच्या या कृतीने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकल्याचे पाहायला मिळाले. त्यांचा हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. शहाजी बापू पाटील भाषण करत असताना व्यासपीठावर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह काही नेते देखील उपस्थित होते. काय म्हणाले शहाजीबापू पाटील? शहाजी बापू पाटील सांगोला येथील पाण्याच्या मुद्द्यावर बोलत होते. ते बोलत असताना त्यांनी स्वतःच्या तोंडात मारून घेतले. शहाजी बापू म्हणाले, ज्यांनी पाणी आडवण्याचे काम केले, त्यांना तुम्ही खासदार म्हणून संसदेत पाठवले. पण ज्यांनी तुम्हाला पाणी दिले, त्यांना तुम्ही घरी बसवले. त्यामुळे आपल्याला देखील काहीतरी वाटायला पाहिजे. आपल्या या चुकीमुळे आपण तोंडात मारून घेतले पाहिजे, असे म्हणत शहाजी बापू पाटील यांनी भरसभेतच स्वतःच्या तोंडात मारून घेतले. त्यांच्या या कृतीने सर्वांचेच लक्ष वेधले आणि एकच हशा पिकला. पुढे बोलताना शहाजी बापू पाटील म्हणाले, काय माणसे आहोत आपण? आपण काय केले? ज्यांनी पाणी आडवले त्यांना खासदार केले आणि पाण्यासाठी ज्यांनी काम केले, त्यांना घरी बसवले. ही गोष्ट आपल्या काळजाला लागली, असे शहाजी बापू पाटील म्हणाले. लोकसभेच्या निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील हे निवडून आले, तर रणजित नाईक निंबाळकर यांचा पराभव झाला होता. यावरून शहाजी बापू पाटील बोलत होते. पुढे शहाजी बापू पाटील म्हणाले, आरडून-ओरडून प्रश्न सुटत नाहीत. जनतेच्या विकासाची कामे करायची असतील तर सत्तेच्या जवळ असले पाहिजे.