शहरात पोलिस आहेत का?:वाळूजमध्येच 6 दिवसांत पोलिसांच्या नाकावर टिच्चून दुसरा सशस्त्र दरोडा, 10 किमी परिसरात दरोड्यांचे सत्र सुरूच

शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत चोरट्यांनी पोलिसांच्या नाकावर टिच्चून सहा दिवसांच्या आतच दुसरा दरोडा टाकला. रविवारी (१८ मे) मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास रामराई शिवारात वाघमारे कुटुंबीयांच्या तलावाच्या समोरील घरातच आठ जणांच्या टोळक्याने सशस्त्र दरोडा टाकला. यात कुटुंबातील तीन जण गंभीर जखमी झाले. दोन महिलांच्या गळ्यातील एकूण ११ ग्रॅम वजनाच्या कानातील बाळ्या, गळ्यातील पोत असा एकूण ३३ हजारांचा तर सध्याच्या बाजारमूल्यानुसार अंदाजे एक लाखाच्या मुद्देमालाचा ऐवज चोरट्यांनी पळवला आहे. दरम्यान, काही वेळाने आलेल्या श्वानपथकाने गावातीलच शेतात लपलेल्या सतीश राजू ढोकळे यास ताब्यात घेतल्याची माहिती वाळूज पोलिस ठाण्याचे शितोळे यांनी दिली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनांमुळे पोलिस शहरात आहेत का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. वाळूज भागात गेल्या महिनाभरातील हा पाचवा दरोडा आहे. गेल्या पंधरा दिवसांच्या आत शहर हद्दीत सहा सोनसाखळ्या हिसकावल्याच्या, तीन तोतया पोलिसांनी लुटल्याच्या घटना घडल्या. विशेष म्हणजे आता तोतया पोलिस म्हणून आलेल्या भामट्याने एमजीएम परिसरात थेट हल्ला करून सोने लुटले आहे. मारहाण बघून ११२ ला फोन केला, जमावामुळे दरोडेखोर पळाले घटना बघताच ११२ वर पोलिसांशी संपर्क केला. त्यानंतर गावातील काकांना फोन केला. ते गावातील काही मंडळींसोबत घराकडे आले. जमावाच्या या आवाजामुळे सगळे दरोडेखोर पळून गेले. त्या आरोपींना तत्काळ अटक करायला हवी. – प्रसाद वाघमारे, विद्यार्थी. कठोर कारवाई करा पोलिसांनी मकोका लावावा, तडीपारीच्या कारवाया करणे आवश्यक आहे. पुढील आठवड्यात पुुन्हा एकदा बैठक घेऊन आढावा घेतो. -संजय शिरसाट, पालकमंत्री. मृत्यू डोळ्यासमोर दिसला मध्यरात्री घराच्या बाहेरून सूनबाईचा किंचाळल्याचा आवाज आल्याने बाहेर आलो. तेव्हा काहींनी त्यांच्यावर हल्ला चढवला होता. मी घराचा दरवाजा उघडताच त्यांनी माझ्यावरही लाकडी दांड्याने हल्ला चढवला. -दिगंबर वाघमारे, वृद्ध. १० किमीच्या अंतरावर दुसरा दरोडा एमआयडीसी परिसरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या बंगल्यापासून केवळ १० किमी अंतरावर रामराई शिवारात हा दुसरा दरोडा आहे. गस्त वाढवत आहोत शहरातील रात्री व दिवसाची गस्त वाढवली. ग्रामरक्षक दलाचीदेखील मदत घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. नागरिकांनी पोलिस प्रशासनावर विश्वास ठेवून घटना घडल्यानंतर तातडीने संपर्क करावा. – नितीन बगाटे, पोलिस उपायुक्त