शहीद भगतसिंगांचे ऐतिहासिक दस्तावेज परत आणा:शहीद दिनी राष्ट्रपतींना एआयएसएफची निवेदनाद्वारे भावनिक साद; ब्रिटनमध्ये आहेत दस्तावेज

शहीद भगतसिंगांचे ऐतिहासिक दस्तावेज परत आणा:शहीद दिनी राष्ट्रपतींना एआयएसएफची निवेदनाद्वारे भावनिक साद; ब्रिटनमध्ये आहेत दस्तावेज

प्रतिनिधी | अमरावती शहीद भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी तत्कालीन ब्रिटिश सरकारचा विरोध करताना केंद्रीय असेम्ब्लीत कोणाला इजा होण्याच्या उद्देशाने नव्हे, तर केवळ सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बॉम्बस्फोट घडवून क्रांती संदेश असलेली पत्रके भिरकावली होती. ऐतिहासिक दस्तऐवज असलेली ही पत्रके सरकारने ब्रिटनमधून भारतात परत आणावी, अशी मागणी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (एआयएसएफ) या संघटनेने केली आहे. राष्ट्रपतींनाही यासंदर्भातील मागणीचे निवेदन पाठवले आहे. भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांनी देशासाठी हौतात्म्य पत्करण्याचा दिवस असल्याने रविवारी सकाळी एआयएसएफतर्फे त्यांच्या स्मृती स्तंभाला अभिवादन करण्यात आले. इर्विन चौकात आयोजित या कार्यक्रमाला एआयएसएफच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष दिल्लीच्या संघमित्रा जेना, प्रदेश पदाधिकारी प्रतीक्षा ढोके व धीरज बनकर, विभाग प्रमुख डॉ. ओमप्रकाश कुटेमाटे, नीळकंठ ढोके, उमेश बनसोड आदी उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीतच ही मागणी केली आहे. आजपासून ९६ वर्षांपूर्वी क्रांतिकारक भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी केंद्रीय विधानसभेत ब्रिटिश सरकारचा विरोध व्यक्त करताना पत्रके भिरकावली होती. त्या पत्रकांना ‘रेड पाम्प्लेट’ म्हणतात. या पत्रकाच्या प्रती आणि क्रांतिकारकांचे व्यक्तिगत साहित्य संसद मार्ग पोलिस ठाण्याच्या मालखान्यात अद्याप पडून असल्याची माहिती समोर आली आहे. यासह अन्य ऐतिहासिक साहित्य देखील मालखान्यात आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित या महत्वाच्या गोष्टी आहेत. त्याबाबत सरकारने चौकशी करावी. तसेच लंडनच्या इंडिया ऑफिस लायब्ररी आणि ब्रिटिश म्युझियममध्ये १६०७ अशी पत्रके आहेत, ज्यावर तत्कालीन ब्रिटिश सरकारने १९०१ ते १९४७ या कालावधीत प्रतिबंध लादला होता. हे दस्तावेज २०१७-१८ मध्ये सार्वजनिक केले होते. त्यामुळे त्या प्रती भारतात आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, तसेच देशाच्या न्यायपालिकेत १९०० ते १९४७ या कालावधीत जे आरोपपत्र दाखल केले होते, ते न्यायालयीन दस्तावेज म्हणजे स्वातंत्र्यलढ्यात सामान्य व्यक्तीच्या सहभागाची गाथा सांगणारे जिवंत पुरावे आहेत. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले हे दस्तावेज एकत्र करून सर्वसामान्यांची माहिती देशासमोर मांडावी, जेणेकरून देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची यशोगाथा लोकांसमोर येईल, असेही ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या निवेदनात म्हटले. कार्यकर्त्याने ऐकवली भगतसिंगांची अंतिम इच्छा देश आणि मानवतेसाठी ज्या काही तीव्र इच्छा माझ्या मनात होत्या, त्याचा हजारावा हिस्साही मी पूर्ण करू शकलो नाही. जिवंत राहू शकलो असतो तर बहुतेक त्यांना पूर्ण करण्याची संधी मला मिळाली असती आणि त्या इच्छा मी पूर्ण करू शकलो असतो. याशिवाय कोणतीही लालूच माझ्या मनात फाशीपासून वाचून राहण्यासाठी कधी आलीच नाही. माझ्यापेक्षा जास्त सौभाग्यशाली कोण असेल? मला स्वतःचा प्रचंड अभिमान वाटतोय. आता प्रचंड अधीरतेने शेवटच्या परीक्षेची मी वाट बघतोय. इच्छा आहे ती अजून जवळ यावी. -भगतसिंग

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment