शहरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने उडवली दाणादाण:छत्रपती संभाजीनगरात 45 किमी प्रतितास वेगाने वाहिले वारे, 16 ठिकाणी झाडे उन्मळली

सलग तिसऱ्या दिवशी सोमवारी (१९ मे) शहर परिसरात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस पडला. पावसासोबतच शहर परिसरात ४५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहिल्याने १६ ठिकाणी झाडे उन्मळून पडली. यामुळे वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांचे हाल झाले. शहरात चिकलठाणा वेधशाळेत ५ मिमी, एमजीएम वेधशाळेत ३ मिमी पर्जन्यमानाची नोंद घेतली. तर, पडेगावात मुसळधार सरी कोसळल्या. ३३ केव्ही पोखरी सबस्टेशनला जाणाऱ्या लाइनचे दोन पोल तुटले आहेत. यामुळे या संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा दुपारपासून बंद आहे. पिसादेवी, पोखरी, हर्सूलसह शहरातील टीव्ही सेंटर, बजरंग चौक परिसर, सिडकोचा काही भाग, गारखेडा परिसर, जुने शहर, गारखेडा परिसर, मुकुंदवाडी आदी भागातील वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्राहकांची प्रचंड गैरसोय झाली. विजेअभावी लिफ्ट बंद, पत्रे उडाले प्रोफेसर कॉलनीत वीज तारेवर झाड पडल्याने डीपी वाकली. यामुळे परिसरात करंट उतरला. सावरकर चौकात वीजपुरवठा खंडित झाल्याने लिफ्टमध्ये ४ नागरिक अडकले, तर एन-१२ येथे इमारतीच्या काचा हवेमुळे पडल्या. सिडकोतील रवी अपार्टमेंट येथे अंडरग्राउंडमध्ये पाणी घुसले, तर नायगाव येथे ६ वर्षांचा मुलगा तलावात पडला. सावंगी परिसरातील कृष्णपूरवाडी येथे वादळामुळे २० नागरिकांच्या घरावरची पत्रे उडाले. १ महिला जखमी झाली. स्ट्रॉम वॉटर ड्रेन नसल्याने घरात घुसले पाणी बायजीपुरा गल्ली नंबर ११ येथे पाणी साचून नागरिकांच्या घरात पाणी साचले. गारखेडा परिसर, मयूर पार्क परिसरातील अनेक घरांत पाणी घुसले. गल्ल्यांमध्येदेखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना जाणे-येणे अवघड झाले होते. (पडेगाव परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडल्याची नोंद एमजीएम वेधशाळेने घेतली आहे.) या ठिकाणी पडली झाडे; वाहतूक झाली विस्कळीत सेंट्रल नाका वॉर्ड कार्यालय, रामलीला मैदानाच्या बाजूला एन-७, मौलाना आझाद स्टेडियम, नवभारत हाउसिंग सोसायटी एन-८, छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाच्या बाजूला साठे चौक, बजरंग चौक सिडको येथे रस्त्यावर चार ते पाच झाडे पडली, सुरेवाडी गल्ली नं. ५, एन-१२ हडको, सत्यमनगर एन-५, जागृत हनुमान मंदिर- प्रतापनगर, एन-९, ताज हॉटेलजवळ, एन-७ पोस्ट ऑफिस आदी ठिकाणी झाड पडल्याचे कॉल मनपा फायर ब्रिगेडला आले. तर याशिवाय अनेक ठिकाणी झाडे पडली, फांद्या तुटल्या आहेत.