शालार्थ आयडी घोटाळ्यातील मुख्य आरोपी गजाआड:लक्ष्मण मंघामला पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी कारवाई झाली आहे. सदर पोलिसांनी मुख्य आरोपी लक्ष्मण मंघाम याला घर सोडण्याच्या तयारीत असतानाच अटक करून सायबर पोलिसांच्या हवाली केले आहे. मंघाम यानेच उपसंचालक उल्हास नरड यांचा पासवर्ड चाेरी करून घरी बसून बनावट शालार्थ आयडी तयार केले. मंघाम वाडी परिसरातील दाभा येथील वासंती अपार्टमेंटमधील ३०२ क्रमाकांच्या सदनिकेत राहात होता. सदर पोलिस ठाण्यातील हवालदार प्रलेश कापसे व सुशिल श्रीवास यांना गोपनीय बातमीदाराव्दारे आरोपी लक्ष्मण उपासराव मंघाम (वय ४७) हा त्याच्या गाडीने नागपूर सोडण्याचे तयारीत आहे अशी माहिती मिळाली. मंघाम घर सोडण्याच्या तयारीत असताना अत्यंत शिताफितीने घेराव करून त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षण उपसंचालक कार्यालयातील राजेंद्र पाटील यांनी या प्रकरणी फिर्याद दिली होती. मंघाम याने विभागीय शिक्षण उपसंचालक, नागपूर या कार्यालयाचे आदेश नसतांना अणि या कार्यालयाचे ऑनलाईन लॉगीन आयडी व पासवर्डचा गैरमार्गाने उपयोग केला. २० मार्च २०१९ ते आचपर्यत चौकशी अधिकाऱ्याच्या यादीमधील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा बनावट शालार्थ प्रणालीकरीता ड्राफ्ट तयार केला. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात गैरव्यहार झाले. मंघाम विरूध्द सायबर पोलिस ठाण्यात कलम ३१९ (२), ३१८ (४), ३३८, ३३६ (३), ३४० (१), ३४० (२) भा. न्या सं सहकलम ६६ (सी) माहिती तंत्रज्ञान अन्वये गुन्हा नोंद आहे. या गुन्ह्याचा सखोल तपास सायबर पोलिस करीत असल्याने मंघामला सायबर पोलिसांच्या हवाली करण्यात आले.