शरद पवारांनी गद्दार म्हणत पाडण्याचे केले आवाहन:दिलीप वळसे पाटलांनी मांडली भूमिका, पवारांवर केली टीका

शरद पवारांनी गद्दार म्हणत पाडण्याचे केले आवाहन:दिलीप वळसे पाटलांनी मांडली भूमिका, पवारांवर केली टीका

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात सर्वत्र प्रचार सभा सुरू आहेत. आंबेगाव येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांची सभा बुधवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते व उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली आहे. दिलीप वळसे पाटलांनी आमची साथ सोडली. त्यांनी गद्दारी केली आणि गद्दारांना शिक्षा करायचे असते. दिलीप वळसे पाटलांचा 100 टक्के पराभव करा, असे आवाहन शरद पवारांनी केले आहे. यावर आता दिलीप वळसे पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. दिलीप वळसे पाटील म्हणाले, आपल्या विरोधी उमेदवारांचीह नुकतीच सभा पार पडली. या सभेत बरेच काही बोलले गेले. मात्र मी त्याबाबत आज बोलणार नाही. 18 तारखेला आपल्या सांगता सभेतून मी सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे. अशी भूमिका वळसे पाटलांनी घेतली आहे. पुढे ते म्हणाले, आपले पाणी नगर जिल्ह्यात जाणार की नाही, याबाबत त्यांच्या सभेत पवार साहेबांनी एक शब्दही उच्चारला नाही, अशी टीका वळसे पाटील यांनी शरद पवारांवर केली आहे. काय म्हणाले होते शरद पवार?
साडे तीनशे वर्षांपूर्वी गणोजी शिर्केने छत्रपती संभाजी महाराजांशी गद्दारी केली, ती गद्दारी अद्यापही महाराष्ट्र विसरलेला नाही. त्यामुळे गणोजीला आता सुट्टी नाही, ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता सुट्टी नाही. ज्यांना पद, शक्ती आणि अधिकार दिले, तेच गद्दार झाले. आता या विधानसभा निवडणुकीमध्ये वळसे पाटलांना शंभर टक्के पराभूत करा. मी दिलीप वळसे पाटील यांना संधी दिली. आमदार केले, मंत्री केले. विधानसभेचं अध्यक्ष केले. मात्र त्यांनी विचाराशी गद्दारी केली आणि आमची साथ सोडली. जो गद्दारी करतो, त्याला माफी नसते. या निवडणुकीत त्यांना पराभूत करत धडा शिकवा. दरम्यान, आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक चांगलीच रंगणार हे निश्चित आहे. गेल्या सात निवडणुकांमध्ये चढत्या मताधिक्याने दिलीप वळसे पाटील आता यंदा आठव्यांदा निवडणूक लढवत आहेत. महायुतीचा पाठिंबा मिळाला आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे माजी सभापती देवदत्त निकम हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत देवदत्त निकम यांनी तिकीट न मिळाल्याने अपक्ष उभे राहिले व विजयी देखील झाले होते. पक्षाच्या फूटीनंतर त्यांनी शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment