शरद पवारांना अजित पवारांचा पुन्हा मोठा धक्का:जळगाव जिल्ह्यातील दोन मातब्बर नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार

जळगाव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जळगाव जिल्ह्यातील दोन मातब्बर नेते आता अजित पवार यांच्या नेतृत्वात त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. यामध्ये डॉ. सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर यांचा समावेश आहे. या दोघांच्या नेतृत्वात अनेक स्थानिक कार्यकर्ते देखील अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा शरद पवार यांना मोठा फटका मानला जात आहे. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात आता मोठी खळबळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दोन माजी मंत्री असलेले डॉक्टर सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर हे लवकरच अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. या संभाव्य राजकीय बदलामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हे पक्षप्रवेशाचे औपचारिक प्रवेश सोहळे पार पडतील. वास्तविक 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्याचबरोबर विधानसभेच्या निवडणुकीत देखील शरद पवार यांच्या पक्षाला जळगाव जिल्ह्यात मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण तयार झाले होते. या सर्व पार्श्वभूमीवर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत. त्यामुळे आता स्थानिक पदाधिकारी आणि नेते पक्ष सोडून गेल्यास याचा फटका शरद पवार यांच्या पक्षाला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपासून पक्षांतराची चर्चा डॉ. सतीश पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच पक्ष सोडण्याचे संकेत दिले होते. आम्ही सध्या विरोधी पक्षात असल्याने कार्यकर्त्यांच्या समस्या मार्गी लागत नाहीत. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन त्यांच्याशी चर्चा करूनच पुढील काळात निर्णय घेण्यात येईल, असे मत सतीश पाटील यांनी व्यक्त केले होते. सतीश पाटील यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात त्यांच्या पक्षांतराची चर्चा रंगली होती.