शरद पवारांना परभणीत मोठा धक्का:माजी आमदार बाबाजानी दुर्राणी सोडणार साथ, 8 जून रोजी अजितदादांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश

शरद पवार यांना परभणीत मोठा धक्का बसला आहे. शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील परभणीतील नेते आणि माजी आमदार बाबाजानी दुर्राणी हे शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाची तारीख देखील ठरली आहे. बाबाजानी दुर्राणी यांनी आज कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. एकीकडे शरद पवार आणि अजित पवार गट पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. तर दुसरीकडे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी हे शरद पवार यांची साथ सोडून राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. पुढील काही काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बाबाजानी दुर्राणी यांचा अजित पवार गटात होणारा प्रवेश शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. बाबाजानी दुर्राणी यांनी आज पाथरीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी पक्षांतराचा निर्णय जाहीर केला असून अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. येत्या ८ जून रोजी बाबाजानी दुर्राणी हे पाथरीत अजित पवार यांच्या उपस्थितीत आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह अधिकृतपणे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. बाबाजानी दुर्राणी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला मोठे खिंडार पडणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रात अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू झाल्या आहेत. यावर अनेक तर्क वितर्क देखील लावले जात आहेत. याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनाच प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी एका वाक्यातच विषय संपवला. दोन्ही पवार कधी एकत्र येणार? असा प्रश्न विचारला असता, शरद पवार ‘मला माहीत नाही’, असे म्हणाले. तर याबाबत बोलताना रोहित पाटील म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? हा प्रश्न जसा तुम्हाला पडला आहे, तसाच अनेकांना पडला आहे. दोन्ही पवार एकत्र येणार ही फक्त चर्चा आहे. वरिष्ठांनी याबाबत काहीही सांगितलेले नाही. दुसरीकडे, अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित येण्याच्या चर्चांवर बोलणे टाळले. पत्रकारांनी त्यांना आज याबाबत प्रश्न विचारला असता, ते यावर काहीच प्रतिक्रिया न देता पत्रकारांच्या समोरून निघून गेले. हे ही वाचा… सर्व गोष्टी बोलून का दाखवतात? काही गोष्टी मनात ठेवा:अजित पवार यांचा कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना सल्ला; दोन्ही NCP एकत्र येण्यावर बोलणे टाळले सर्व गोष्टी बोलून का दाखवतात? काही गोष्टी मनात ठेवा, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दिला आहे. राज्याचे कृषिमंत्री पद म्हणजे ओसाड गावाचा सरपंच अशा शब्दात कोकाटे यांनी कृषी मंत्री पदा बाबत वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात वाद निर्माण झाला होता. त्यावर अजित पवार यांनी आता माणिकराव कोकाटे यांना सल्ला दिला आहे. पूर्ण बातमी वाचा…