शरद पवारांचे 5 खासदार फोडले तरच अजित पवारांना केंद्रात मंत्रीपद:संजय राऊत यांचा दावा; मोदी 2029 मध्ये पंतप्रधान असण्यावर प्रश्नचिन्ह
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील 5 खासदार फोडले तरच केंद्रात मंत्री पद दिले मिळेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना सांगितले आहे. असा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या माध्यमातून संजय राऊत यांनी भाजप आणि अजित पवार गटावर निशाणा साधला. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप नेत्यांनी त्यांची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. देशातील व्यवस्था उध्वस्त करण्यासाठी मोदींनी प्रयत्न सुरू केले असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. पवारांचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. शरद पवारांचे पाच खासदार फोडले तरच केंद्रात मंत्री पदे मिळतील, असे भाजपने अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना सांगितले असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे. अदानी हे काय भावे आहेत का? शरद पवार यांनी धर्मांध शक्तीपासून दूर राहण्याचा विचार आत्मसाद केले आहे. त्यामुळे घाबरुन पळून गेलेले आहेत, त्यांच्यासोबत शरद पवार जातील, अशी शंका देखील आपल्या मनात नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. या संबंधीची चर्चा गौतम अदानी यांच्या घरी होत असल्याबद्दल देखील राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अदानी महाराष्ट्राचे भविष्य ठरवणारे कोण? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. ते काय भावे आहेत का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मोदींचा मित्र महाराष्ट्राचे भवितव्य ठरवणार का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कधीही युती किंवा आघाडीमध्ये लढल्या गेल्या नाहीत, असा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या वेगळ्या प्रकारच्या निवडणुका असतात. या वेगळ्या प्रकारच्या निवडणुका असतात. या स्वतंत्र लढल्या गेल्या पाहिजे, या माध्यमातून आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ दिले गेले पाहिजे. या कार्यकर्त्यांचे बळच आगामी विधानसभा आणि लोकसभेला कामी येत असते, असा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे. मात्र कोणताही निर्णय घेताना आम्ही तीन पक्ष एकत्र बसून निर्णय घेणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. मोदी 2029 मध्ये पंतप्रधान असतील का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाने ‘वन नेशन वन इलेक्शन’ या विधेयकला मंजूरी दिली आहे. यावर देखील संजय राऊत यांनी टीका केली. या देशात एकत्र निवडणुका होऊ शकत नाही, असा दावा देखील त्यांनी केला. 2029 मध्ये तशा निवडणुका घेण्याची तयारी भाजप करत आहेत. मात्र, मोदी 2029 मध्ये पंतप्रधान असतील का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.