शरद पवार गटाचे आमदार अजित पवार यांच्या भेटीला:त्यांची प्रकृती खराब पण ते राजकीय आजारी नव्हते; शशिकांत शिंदे यांचा दावा

मुख्यमंत्री अजित पवार यांची प्रकृती ठीक नव्हती. मात्र त्यांना राजकीय आजार नव्हता, असे दिसत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे. शशिकांत शिंदे यांनी आज अजित पवार यांची यांच्या नागपूर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, आमची केवळ सदिच्छा भेट होती. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भेटलो असल्याचे शशिकांत शिंदे यांनी सांगितले. तसेच आपण शरद पवार यांना कधीही सोडणार नाही, असे देखील शिंदे यांनी स्पष्ट केले. महायुतीच्या नेत्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता दिसून येत असल्याचा दावा आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे. आम्ही अनेक नेत्यांशी सध्या चर्चा करत असतो. आमच्या भेटी होत असतात. त्यात ते नेते खदखद व्यक्त करत असल्याचे देखील शिंदे यांनी म्हटले आहे. अनेक महत्त्वाच्या नेत्यांना डावलण्यात आले आहे. यात नवीन आमदारांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे जुने कार्यकर्ते नाराज असल्याचे देखील शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे. शरद पवार सर्वांना संधी देत होते छगन भुजबळ नाराज असल्याबाबत देखील शशिकांत शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र तो त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याचे शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे. मात्र शरद पवार यांच्या पक्षामध्ये सर्व नेत्यांना समान संधी दिली जात होती. सर्व नेत्यांशी चर्चा करूनच एखादा निर्णय घेतला जात होता, असा दावा देखील शशिकांत शिंदे यांनी केला. मात्र, आता त्यांच्या पक्षातला तो अंतर्गत विषय असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. सभापती पदावर आज निर्णय विरोधी पक्ष नेते पद तसेच विधान परिषदेतील सभापती पदाबाबत अद्याप महाविकास आघाडीत एकमत झालेले नाही. यावर देखील आमदार शशिकांत शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर आम्ही आज चर्चा करणार असल्याची माहिती देखील शशिकांत शिंदे यांनी दिली. आज आघाडीतील सर्व पक्षाचे नेते एकत्र बसणार आहेत. त्यानंतरच विधान परिषद सभापती तसेच विरोधी पक्ष नेते पदावर चर्चा करणार असल्याची माहिती शशिकांत शिंदे यांनी दिली आहे.

  

Share