शेवगाव-पाथर्डी महामार्गावर भीषण अपघात:राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांनी भर पावसात केली मदत, जखमींसाठी ताफ्यातील गाडी दिली

शेवगाव-पाथर्डी महामार्गावर भीषण अपघात:राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांनी भर पावसात केली मदत, जखमींसाठी ताफ्यातील गाडी दिली

शेवगाव-पाथर्डी महामार्गावर रविवारी दुपारी भर पावसात दोन दुचाकीस्वारांचा भीषण अपघात झाला. यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले. यावेळी मार्गावरून प्रवास करत असलेल्या राज्याच्या महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हा प्रसंग लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखत रस्त्यावर उतरून स्वतः मदतीसाठी पुढाकार घेतला. घटनेदरम्यान मुसळधार पाऊस कोसळत होता. पावसाची तमा न बाळगता राज्यमंत्री बोर्डीकर यांनी अपघातस्थळी थांबत जखमींची विचारपूस केली. त्यांनी आपल्या ताफ्यातील पोलिस गाडी थांबवत ती जखमींना रुग्णालयात पाठवण्यासाठी दिली. तसेच जखमींवर तातडीने वैद्यकीय उपचार होतील यासाठी रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधत आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देशही पोलिस अधिकाऱ्यांना दिले. अपघात झाल्यानंतर काही काळ महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. उपस्थित नागरिकांनी देखील मदतीसाठी पुढे येत पोलिस आणि आपत्कालीन सेवांना माहिती दिली. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. राज्यमंत्री बोर्डीकर यांचा हा संवेदनशील व तात्काळ प्रतिसाद सामाजिक जाणिवेचे उदाहरण ठरतो आहे. त्यांच्या या कृतीमुळे नागरिकांची मने जिंकली आहेत. दरम्यान, या अपघातामुळे पाथर्डी-बीड महामार्गावरील वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी या मार्गावर गतीरोधक, इशारा फलक आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात अशा दुर्घटना टाळता येतील.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment