शेतात मजूर मिळत नाहीत, मोफत मिळणाऱ्या धान्याचाही गैरवापर:सरकारने मोफत योजना बंद कराव्यात; भाजप आमदार सुरेश धस यांची मागणी

सरकारने मोफत योजना बंद कराव्यात, अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली आहे. संगमनेर येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना सुरेश धस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारकडून मिळणाऱ्या मोफत योजनांमुळे मजूर मिळत नसल्याचे भाष्य केले आहे, तसेच मोफत योजना बंद करण्यात याव्यात अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. सुरेश धस पत्रकारांशी बोलताना म्हणाले, गरिबांना मोफत अन्नधान्य मिळत असल्याने शेतावर काम करण्यासाठी मजूर मिळत नाहीत. शेतकऱ्यांना मजुरांच्या घरी जाऊन विनंती करावी लागते. शिवाय सरकारकडून वाटप होणाऱ्या मोफत धान्याचा आणि इतर काही योजनांचा गैरवापरही होत आहे, त्यामुळे सरकारने अशा मोफत योजना बंद केल्या पाहिजेत, अशी मागणी धस यांनी केली आहे. पुढे बोलताना सुरेश धस म्हणाले, सरकारकडून मोफत योजना राबवल्या जातात. त्यामुळे ग्रामीण भागात शेतीसाठी मजूर मिळत नाही. मोफत धान्यामुळे अनेक लोक मजुरीचे काम करण्यास तयार होत नसल्याचा अनुभव येतो. त्यामुळे परराज्यातून मजूर आणण्याची वेळ आली आहे. तसे झाले तर स्थानिक मजुरांचा रोजगार भविष्यात कमी होईल, अशी भीती देखील सुरेश धस यांनी यावले बोलताना व्यक्त केली आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्याचे केले समर्थन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. यावर देखील सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुरेश धस यांनी माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. कोकाटे यांचा ग्रामीण भागाशी जवळचा संबंध आहे. त्यामुळे त्यांचे बोलणे सरळ आहे. मात्र, त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. कोकाटे यांचा शेतकऱ्यांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता, असे त्यांनी म्हटले आहे.