शेतकरी आंदोलकांचे चंदीगडकूच पोलिसांनी रोखले:धरपकड, चंदीगडच्या 18 सीमा कडेकोट बंद

पंजाब सरकारने शेतकऱ्यांच्या चंदीगड चलो आंदोलनाला पूर्णपणे अयशस्वी केले आहे. पोलिसांनी शेतकऱ्यांना गावातूनच बाहेर पडू दिले नाही. अनेक शेतकरी नेत्यांना घरातूनच अटक करण्यात आली आहे. अनेकांना ट्रॅक्टर-ट्रॉलीतच रोखण्यात आले. काहींना बसमधून उतरवून ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. काही शेतकऱ्यांना गुरुद्वारा साहिबच्या परिसरात घेरण्यात आले. रोपडचे १०० शेतकरी १५ ट्रॅक्टर-ट्रॉली घेऊन मोहालीला दाखल झाले. त्याचवेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी चंदिगडच्या १८ सीमा देखील बंद केल्या. त्यामुळे शेतकरी आंदोलक जायबंदी झाल्याची स्थिती दिसून आली. शेतकरी चंदीगडपर्यंत पोहोचू शकले नाहीत. पोलिसांनी संपूर्ण दिवसभर राज्यभरातील िलंक रोड, महामार्ग व राष्ट्रीय महामार्गावरील बंदोबस्तामध्ये मोठी वाढ केली होती. चंदीगडकडे कूच करण्याच्या आंदोलनात पुरुषांसह महिला देखील सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. शेतकऱ्यांचा १० ठिकाणी ठिय्या पोलिसांनी रोखल्यामुळे शेतकऱ्यांनी १० ठिकाणी जोरदार आंदोलन करून ठिय्या केला. शेतकऱ्यांनी अमृतसरमध्ये गोल्डन गेटवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा पुतळा पेटवून दिला. दुसरीकडे ३ मार्च रोजी चंदिगडमध्ये मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर अनेक दिग्गज नेते भूमिगत झाल्याचे सांगण्यात येते.