शिंदे गटात निष्ठा दिसत नाही:आमदारांच्या नाराजीवरुन संजय राऊत यांचा निशाणा; ठाकरे-फडणवीसांच्या भेटीत खळबळ काय? माध्यमांनाच प्रतिप्रश्न
ज्यांना मंत्रिपदे मिळाले नाही त्यांच्याकडे निष्ठा वगैरे काही दिसत नाही. काही लोक बॅगा भरून नागपुरातून निघून गेले आहेत. शिवसेना पक्षामध्ये असे कधीही झाले नाही. आमच्या पक्षात असे चालत नाही, असा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असेल तर त्यात खळबळ माजण्यासारखे काही नाही, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी देखील राज्यातील सर्व माजी मुख्यमंत्र्यांना फोन करून शुभेच्छा घेतल्या होत्या, असा दावा देखील राऊत यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी फडणवीस यांची भेट घेतली, त्यात खळबळ काय? असा प्रतिप्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे. आम्ही हिंदुत्वापासून कधीही फारकत घेतली नाही, असे म्हणणाऱ्यांची मला कीव येते, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. बांगलादेश मध्ये हिंदूंवर हल्ले झाले, दादर मधील हनुमान मंदिरावर भाजपचे बुलडोजर आले, सावकरांचा प्रश्न असेल अशा प्रत्येक वेळी सर्वात आधी ठाकरेंची शिवसेना पुढे आली, असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. भुजबळ यांच्या बद्दल सहानुभूती छगन भुजबळ एकेकाळी आमचे ज्येष्ठ सहकारी होते. त्यांच्याविषयी आमच्या मनामध्ये प्रचंड सहानुभूती आहे. पूर्वी ते शरद पवार यांचे सहकारी होते. आता अजित पवार यांचे सहकारी झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी मला काही बोलायचे नाही. ते भाजपचे नेते नव्हे तर ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नेते आहेत, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. बेळगावच्या प्रश्नावर महापौर असताना बेळगावत जाऊन आंदोलन करणारे ते महत्त्वाचे नेते होते. त्यासाठी दोन महिन्यापेक्षा जास्त काळ महापौर असताना देखील ते तुरुंगात राहिले. त्यांना प्रचंड मारहाण करण्यात आली होती, हे देखील आम्ही पाहिले आहे. ते मैदानातून कधीही पळत नाही, हे मी खात्रीने सांगू शकतो. मात्र ते त्यांची लढाई लढतील, ते समर्थ आहेत, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. मात्र भुजबळांचे नाव कोणी कापले? हे आपल्याला माहिती नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. अजित पवारांच्या पक्षाकडे विचारधारा नाही, तो एक गटच अजित पवार यांच्या पक्षाला कोणतीही विचारधारा नाही. तो पक्ष नसून एक गट असल्याचे आम्ही म्हणतो. अजित पवार यांना पक्ष म्हणून अमित शहा यांनी मान्यता मिळवून दिली असली तरी देखील तो एक गटच आहे, असा दावा राऊत यांनी केला आहे. खरा पक्ष हा विचारधारा घेऊन चालणारे शरद पवार यांचा असल्याचे देखील ते म्हणाले. खरा पक्ष हा अजित पवार यांचा नसून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा असल्याचे देखील राऊत यांनी म्हटले आहे. नेहरूंविषयी भाजपच्या मनात असूया पंडित जवाहरलाल नेहरू हे अतिशय महान नेते होते. त्यांच्यासारखे महान आपण होऊ शकलो नाही, त्यामुळे त्यांच्याविषयी भाजपाच्या मनात असूया असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. किती दिवस तुम्ही पूर्वी झालेल्या घटनांचे दळण दळण बसणार आहात. देशाच्या आजच्या स्थितीवर काही बोलणार आहे की नाही? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. भाजपच्या खासदारांमध्ये त्यांचा व्हीप न पाळण्याची हिंमत वाढत आहे. आणि हीच हिम्मत एक दिवस सत्ता उलटून दाखवेल, असा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… शरद पवार गटाचे आमदार अजित पवार यांच्या भेटीला:त्यांची प्रकृती खराब पण ते राजकीय आजारी नव्हते; शशिकांत शिंदे यांचा दावा मुख्यमंत्री अजित पवार यांची प्रकृती ठीक नव्हती. मात्र त्यांना राजकीय आजार नव्हता, असे दिसत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे. शशिकांत शिंदे यांनी आज अजित पवार यांची यांच्या नागपूर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, आमची केवळ सदिच्छा भेट होती. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भेटलो असल्याचे शशिकांत शिंदे यांनी सांगितले. तसेच आपण शरद पवार यांना कधीही सोडणार नाही, असे देखील शिंदे यांनी स्पष्ट केले. पूर्ण बातमी वाचा…