शिर्डीच्या साई संस्थानच्या जेवणासाठी कूपन बंधनकारक:दुहेरी हत्याकांडानंतर मोठा निर्णय, गुरुवारपासून निर्णयाची अंमलबजावणी

अहिल्यानगर येथील प्रसिद्ध शिर्डी येथील शिर्डी संस्थानच्या वतीने सुरू असलेल्या अन्नछत्राच्या मोफत भोजन सुरू असते. हजारो भाविक येथील जेवणाचा व प्रसादाचा लाभ घेतात. मात्र, आता यात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या पुढे आता जेवणासाठी कूपन बंधनकारक करण्यात आले आहे. कूपन असेल तरच भाविकांना प्रसादाचा लाभ घेता येणार आहे. शिर्डी येथे झालेल्या दुहेरी हत्याकांडानंतर शिर्डी संस्थानने हा निर्णय घेतला आहे. पूर्वी शिर्डी येथील या प्रसादालयात मोफत जेवणासाठी कूपनची गरज नव्हती. भाविकांना थेट प्रवेश देण्यात येत होता. मात्र, आता कूपन बंधनकारक असणार आहे. गुरुवार 6 फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. या संदर्भातील माहिती साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे. शिर्डी संस्थानच्या या प्रसादालयात जेवणासाठी त्याच ठिकाणी कूपन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच साई संस्थानच्या भक्त निवासात सुद्धा कूपन देण्यात येणार आहेत. त्यामुळे भाविकांची गैरसोय देखील होणार नाही. शिर्डी येथे दुहेरी हत्याकांड झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या संस्थानमध्ये काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, शिर्डी येथे मिळत असणाऱ्या या मोफत जेवणावर माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी टीका केली होती. शिर्डी संस्थानातील मोफत जेवणामुळे सगळ्या देशातील भिकारी शिर्डीमध्ये जमा होतात, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते. तसेच यामुळे गुन्हेगारीमध्ये वाढ होऊन शिर्डीकरांची सुरक्षा धोक्यात येत आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे. मोफत जेवण न ठेवता 25 रुपायांमध्ये जेवण द्यावे, अशी मागणी देखील सुजय विखे पाटलांनी केली होती.

  

Share