शिवसेना नेते अशोक धोडी यांच्या हत्येचा थरार:300 सीसीटीव्ही तपासले, अखेर गाडीच्या सेन्सरच्या तुकड्यावरून लागला शोध
शिवसेनेचे पालघरचे पदाधिकारी अशोक धोडी यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पालघर पोलिसांनी बारकाईने तपास करत अशोक धोडी यांचा मृतदेह तसेच त्यांची कार देखील गुजरातमधून शोधून काढली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अशोक धोडी यांचा मृतदेह त्यांच्याच कारच्या डिक्कीमध्ये ठेवण्यात आला होता आणि ही कार एका बंद पडलेल्या खदानीच्या पाण्यात ढकळून देण्यात आली होती. आरोपी अविनाश धोडी व इतर आरोपींनी अशोक धोडी यांचा मृतदेह सापडलाच नाही पाहिजे अशी व्यवस्था केली होती. गुजरात येथील सारिग्राममधील बंद पडलेल्या दगड खदानीमध्ये कारसकट अशोक धोडी यांना पाण्यात बुडवण्यात आले होते. मात्र सेन्सरच्या एका मायक्रो तुकड्यामुळे या कारचा पोलिसांना शोध लागला आणि हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. या मायक्रो तुकड्यावरून पोलिसांनी थेट गुजरात गाठत प्रकरणाला वाचा फोडली. अशोक धोडी व त्यांचे बंधू आरोपी अविनाश धोडी यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून घरपट्टी आणि दारू सप्लायवरून कौटुंबिक वाद सुरू होते. अविनाश धोडी यांना दमन आणि दादरा नगर हवेली येथील दारू अवैधरित्या महाराष्ट्रात आणून विकण्याचा व्यवसाय होता. मात्र, अशोक धोडी यांचा याला विरोध होता. त्यांनी अनेकवेळा प्रशासनाकडे याची तक्रार देखील केली होती. त्यामुळे अडचण ठरत असलेल्या अशोक धोडी यांचा काटा काढण्याचा निर्णय अविनाश धोडी यांनी केला. अशोक धोडी यांचे 20 जानेवारी रोजी अपहरण करण्यात आले होते. अशोक धोडी यांची हत्या करण्यापूर्वी अशोक धोडी यांचे घर, गाडी आणि गुजरातच्या सारिग्राममधील बंद पडलेल्या दगड खदानीची रेकी केली होती. तब्बल महिनाभर ही रेकी सुरू होती. या हत्येतील जे तीन आरोपी फरार आहेत, त्यातील एक आरोपी सारिग्राम येथील रहिवासी आहे. या आरोपीला या खदानीची माहिती होती, या खदानीचे पाणी कधीच अटत नाही तसेच ही खदान अत्यंत खोल आहे. या ठिकाणी कोणीच कधी फिरकत नाही. त्यामुळे या परिसराची निवड करण्यात आली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. महिनाभर आधीपासून सुरू होती हत्येची तयारी आरोपी अविनाश धोडी तसेच इतर आरोपी अवैध दारूचा धंदा करत असल्याने त्यांना आड मार्गांची चांगलीच माहिती होती. कोणत्या मार्गाने आपण सीसीटीव्ही कॅमेरामध्ये सापडणार नाही याचा त्यांना अंदाज होता. अपहरण आणि हत्या केल्यानंतर संशय येऊ नये म्हणून आरोपींनी आपले सर्व मोबाईल एकाच ठिकाणी ठेवले. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी हे केले. हत्या झाली त्या दिवशी एकाच ठिकाणी बसून रात्रभर पार्टी करत असल्याचे भासवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. गाडीचे जीपीएस अॅक्टिव नसल्याने पोलिसांना अडथळा अशोक धोडी यांचा शोध घेताना पोलिसांना अनेक गोष्टींमध्ये अडथळा येत होता. पालघर पोलिसांनी जवळपास 300 सीसीटीव्ही तपासले. शेवटी गुजरातमधील काही सीसीटीव्हीमध्ये अशोक धोडी यांची गाडी दिसली, त्यानुसार पालघर पोलिसांनी गुजरातच्या या भागातील सर्व ठिकाणे तसेच खाणी तपासणे सुरू केले. अपहरणाच्या दिवशी आरोपींनी केला अशोक धोडींचा पाठलाग आरोपींनी अशोक धोडी यांचा पाठलाग करत झाई बोरीगाव येथील घाटात आयशर टेम्पो धोडी यांच्या गाडी पुढे आडवा लावला आणि मागून एक टेम्पो उभी केली. यामुळे अशोक धोडी यांना पळ काढता आला नाही. यावेळी एकाने अशोक धोडी यांच्या डोक्यात रॉडने जोरदार वार केला. यात अशोक धोडी यांचा मृत्यू झाला. यानंतर अशोक धोडी यांच्या मृतदेहाची वेल्हेवाट लावण्यासाठी आड मार्ग निवडला. मात्र गुजरातमधील एका रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही गाडी दिसली आणि अटक आरोपींकडून मिळालेल्या माहितीवरून पालघर पोलिसांनी गुजरातमधील दगड खाणींची पाहणी सुरू केली. असा सापडला अशोक धोडी यांचा मृतदेह पोलिसांनी गुजरातमधील दगड खाणींची पाहणी सुरू केली तेव्हा एका खाणीच्या टेकड्यावर एका दगडाला गाडीच्या खालचा भाग घासून गेला होता. तिथे एक सेन्सरचा तुकडा पडलेला दिसला. यावरून गाडी याच खाणीमध्ये आहे अशी पोलिसांची खात्री पटली. पोलिसांनी गोताखोरांच्या मदतीने खाणीच्या पाण्यात गाडीचा शोध घेण्यास सुरुवात केली. हा शोध सुरू असताना गाडी 40 फूट खोल पाण्यात आढळली. 31 जानेवारीला पहाटे गोताखोरांच्या मदतीने या दगड खाणीची पाहणी करण्यात आली. यावेळी 40 ते 45 फूट खोल पाण्यात एक लाल कलरची ब्रिझा कार असल्याची माहिती गोताखरांकडून समोर आली. त्यानंतर 6 ते 7 तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही गाडी पाण्याबाहेर काढण्यात पालघर पोलिसांना यश आलं. अन् गाडीच्या डिक्कीत अशोक धोडी यांच्या तोंडाला प्लास्टिक पिशवी बांधून असलेला मृतदेहही आढळला.