शिवसेना शिंदे गटाच्या मुख्य प्रतोदपदी आमदार रमेश बोरनारेंची नियुक्ती:अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विश्वास दर्शक ठराव मांडण्यात येणार
शिवसेना शिंदे गटाच्या मुख्य प्रतोद पदावर वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश बोरनारे यांची निवडण करण्यात आली आहे. मुख्य प्रतोद पदावर निवड झालयावर तातडीने बोरनारे यांनी शिवसेनेच्या सर्व 57 आमदारांसाठी व्हीप जारी केले आहे. सध्या विधिमंडळाचे विशेष अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाचा उद्या शेवटचा दिवस असून सभागृहात विश्वास दर्शक ठराव मांडण्यात येणार आहे. तसेच सभागृहात उपस्थित राहण्याचे आदेश बोरनारे यांनी व्हीपद्वारे दिला आहे. मुख्य प्रतोद रमेश बोरनारे म्हणाले, शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या सर्व विधानसभा सदस्यांना पक्षादेश बजावण्यात येत आहे की, शनिवारी, 7 डिसेंबर 2024 पासून मुंबईत विधान भवन येथे विधिमंडळाचे विशेष अधिवेश सुरु होत आहे. या अधिवेशादरम्यान 9 डिसेंबर 2024 ला सरकारचा विश्वासदर्शक प्रस्ताव आहे. शिवसेना पक्षाच्या विधानसभेच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी सभागृहात पूर्णवेळ उपस्थित राहून विश्वासदर्शक प्रस्तावाच्या बाजूने मतदान करावे, असा पक्षादेश आहे, असे मुख्य प्रतोद रमेश बोरनारे यांनी असे व्हीप मधून म्हंटले आहे. रमेश बोरनारे हे 2019 पासून वैजापूर विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आले आहेत. रमेश बोरनारे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक समजले जातात. 2022 साली झालेल्या सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे यांनी आमदार भरत गोगावले यांना मुख्य प्रतोद केले होते. यंदा आता रमेश बोरनारे यांना संधी देण्यात आली आहे. तसेच भरत गोगावले यांना मंत्रिपदाची संधी देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, सध्या महायुती सरकारमधील मंत्रिमंडळचा विस्तार होणे बाकी असून लवकरच मंत्रिपदे देण्यात येणार आहेत. मंत्रिपदासाठी कोणत्या नेत्यांची वर्णी लागते हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा झाला असल्याचा आरोप करत आहे. तसेच ईव्हीएम हटावसाठी कॉंग्रेस स्वाक्षरी मोहीम देखील राबवत आहे.