शिवतीर्थावर 17 तारखेला राज ठाकरेंची तोफ धडाडणार:बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी शिवाजी पार्कवर मनसेची सभा
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात प्रचार सभांच्या तोफा जोरदार धडाडत आहेत. प्रचार सभांचे आता काही दिवसच शिल्लक राहिले असून सर्वच राजकीय नेत्यांनी प्रचारांचा धडाका व तीव्रता वाढवलेली दिसत आहे. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे, दोघांमध्ये 17 नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी स्पर्धा लागली होती, मात्र राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळाली आहे. 17 नोव्हेंबर या दिवशी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन म्हणून साजरा करण्यात येतो. शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला शेवटची सभा आपल्याला घेता यावी यासाठी दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये चढाओढ सुरू होती. मात्र अखेर राज ठाकरे यांना सभा घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. या परवानगीसाठीचा अर्ज मनसे पक्षाकडून आधी देण्यात आल्याने नियमानुसार ही परवानगी दिल्याचे सांगण्यात आले. उद्धव ठाकरे यांची सभा आता बीकेसी मैदानावर घेण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. 17 नोव्हेंबर हा दिवस बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानणाऱ्या तमाम शिवसैनिकांसाठी महत्त्वाचा असणार आहे. करण त्या दिवशी बाळासाहेब ठाकरे यांचा 12 वा स्मृतीदिन आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी राज्यभरातील हजारो शिवसैनिकांची गर्दी होणार असल्याने इतर कुठल्या पक्षाला या दिवशी सभेसाठी परवानगी दिल्यास संघर्ष उद्भवू शकतो. त्यामुळे इतर कोणाला परवानगी न देता उद्धव ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळावी, यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रयत्न करण्यात आले होते. मात्र त्यास यश आले नसल्याचे दिसत आहे. दरम्यान, दसरा मेळाव्यासाठी देखील मनसे आणि शिवसेना पक्षात सभेसाठी संघर्ष उद्भवत असतो. बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर स्मृतीदिनाच्या दिवशी हजारोंच्या संख्येने शिवसैनिक जमतील तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या शिवतीर्थावरील सभेसाठी परवानगी मिळाल्याने हजारोंच्या संख्येने मनसैनिक सुद्धा येतील. त्यामुळे संघर्ष देखील उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.