शॉर्टसर्किटमुळे आग; गहू, ठिबक संचासह स्प्रिंकल,पीव्हीसी पाइप, चारा जळून खाक:परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान; आर्थिक मदतीची मागणी

येथील आखाडा व गोळेगाव उंडणगाव रोडवरील शिवारात शॉर्टसर्किटमुळे आग लागून दीड एकरातील गहू, ठिबक संच, स्प्रिंकलर संच, पीव्हीसी पाईप, चारा गंजी जळून खाक झाल्याची घटना बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत सुमारे अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. येथील शेतकरी हिम्मत सावळे व बाबुराव यांचे शेत आखाडा शिवारातील गट क्रमांक ४१४ मध्ये आहे. त्यांनी दीड एकरात गहू पेरला होता. हा गहू काढणीला आला असताना, दुपारी शेतातून गेलेल्या वीज तार वाऱ्यामुळे एकमेकांना चिकटल्या आणि ठिणग्या उडाल्या. या ठिणग्या वाळलेल्या उभ्या गव्हावर पडल्याने आग लागली. दुपारची वेळ असल्यामुळे प्रखर ऊन आणि वाऱ्याचा वेग असल्यामुळे काही क्षणांतच आग झपाट्याने पसरली. शेतकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु, जवळपास दीड एकरातील गहू जळून खाक झाला. या शेतात जवळपास २५ क्विंटल गव्हाचे उत्पादन होणार होते. आता मात्र क्विंटलभरही गहू निघणार नसल्याने शेतकरी हिम्मत सावळे व बाबुराव सावळे यांचे मोठे नुकसान झाले आहे. महावितरण कंपनी, महसूल विभागाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. घटनेचा पंचनामा तलाठी तायडे यांनी केला. यावेळी ग्रामसेवक डी. जे. बोराडे, पंकज जैस्वाल, कैलास बसय्ये, दत्तू बोराडे, राजू पाटील, दादाशेठ कौशले आदी उपस्थित होते. आगीने आर्थिक संकटाचा चटका घटनेची माहिती महावितरण, महसूल विभागाला देण्यात आल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली असून त्यांनी पंचनामा केला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला. काढणीसाठी आलेला दीड एकरांतील गहू, शेती उपयोगी साहित्य व शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाल्याने यंदा खरिपात पावसाचा लहरीपणा, किडीचा प्रादुर्भाव यामुळे सोयाबीन, तूर, कापसाचे उत्पादन घटले. बाजारपेठेत भावही समाधानकारक मिळाला नसल्याने लागवडखर्चही वसूल झाला नाही.