सिंहस्थ कुंभमेळासाठी यूपीप्रमाणे कायदा तयार करणार:मेळा प्राधिकरणाचीही होणार स्थापना, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांनी त्र्यंबकेश्वर येथील ज्योर्तिलिंगाचे दर्शन घेतले. तसेच त्र्यंबकेश्वरच्या विकास आराखड्याचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याविषयी माहिती दिली. उत्तर प्रदेशने महाकुंभसाठी ज्याप्रमाणे कायदा तयार केला, तसा कायदा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी करणार असल्याचे ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नाशिकमधील कुशावर्त तीर्थ त्र्यंबकेश्वरची पाहणी केलेली आहे. त्र्यंबकेश्वरचा एक विकास आराखडा प्रशासनाने तयार केला आहे. त्याचे प्रेझेंटेशन मी घेतलेले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा विकास आपण करत आहोत. तसाच त्र्यंबकेश्वरचाही विकास झाला पाहिजे. त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी 1100 कोटी रुपयांचा आराखडा तयार केलेला आहे. त्याचे दोन टप्पे आम्ही करत आहोत. पहिला टप्पा सिंहस्थ कुंभमेळ्यापर्यंत आपल्याला पूर्ण करता येईल आणि दुसरा टप्पा जो आहे, ज्यामध्ये काही कामे होतील. यामध्ये दर्शनासाठी कॉरिडोर तयार करणे, पार्किंगची व्यवस्था, शौचालयांची व्यवस्था, यासह तेथील वेगवेगळ्या कुंडांचे रिस्टोरेशन, तेथील प्रमुख मंदिरांचे रिस्टोरेशन, एएसआयच्या मध्यस्तीने प्रत्यक्ष मंदिरात रिस्टोरेशनची जी आवश्यकता आहे ते आणि अनेक प्रकारच्या सोयी तयार करण्याचा प्रयत्न या आराखडाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पुढच्या तयारीला लागण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. लवकरच आम्ही हा प्रस्ताव हाय पॉवर कमिटी आणि त्यानंतर मुख्यमंत्री कमिटीकडे नेऊ आणि त्याला मान्यता देऊ. नाशिकमधील जी काही कामे आहेत, त्यालाही आम्ही मान्यता दिलेली आहे. जवळपास 11 पूल बांधत आहोत. रस्त्याचे मोठे जाळे तयार करत आहोत. ज्या ठिकाणी साधूग्राम तयार होत आहे, ती सगळी जागा ताब्यात घेत आहोत. त्याचाही विकास आपण करत आहोत. घाटांमध्ये नवीन सोयीसुविधा करत आहोत आणि काही घाट देखील वाढवत आहोत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, याठिकाणी एसटीपीचे जाळे तयार करून पाणी शुद्ध राहिजे पाहिजे, यादृष्टीने एक आराखडा तयार केला आहे. कुठल्याही सिंहस्थाच्या आधी त्याचे काम पूर्ण करायचे ठरवले आहे, असेही फडणवीस म्हणाले. निधी कमी पडू देणार नाही या सगळ्या कामांना मोठ्या निधी लागणार आहे. पण आम्ही राज्य सरकार म्हणून याला निधीची कमतरता पडू द्यायची नाही, असा निर्णय घेतलेला आहे. आवश्यकता तो सगळा निधी उपलब्ध करून देणार आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सिंहस्थसाठी मेळा प्राधिकरणाची स्थापना मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी उत्तर प्रदेश प्रमाणे सिंहस्थ कुंभमेळ्याची पूर्ण जबाबदारी घ्यावी, अशी मागणी त्र्यंबकेश्वरच्या साधूमहंतांनी केली आहे. यावर बोलाताना, कुंभमेळ्यासाठी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी असतेच. पण आपण आता उत्तर प्रदेशने ज्या प्रकारे कुंभमेळ्याचा कायदा तयार केला आणि मेळा प्राधिकरण तयार केले, त्याच धतीर्वर आपलाही कायदा आपण तयार करत आहोत. आपणही मेळा प्राधिकरण तयार करून याला कायदेशीर पूर्ण चौकट देत आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. गर्दीचा अंदाज सध्या करता येणार नाही सिंहस्थ कुंभमेळ्याला किती कोटी लोक येतील, याचा अंदाज आज आपल्याला करता येत नाही. कारण प्रयागराजला वाढीव अंदाज पकडला होता. त्याच्याही तीन पट लोकांनी कुंभमेळ्याला हजेरी लावली होती. त्यामुळे सगळ्या गोष्टींची तयारी झाल्यानंतर तसा अंदाज आपण घेऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मेळा प्राधिकरण प्रशासकीय असणार सिंहस्थच्या प्राधिकरणात साधूमहंतांचा सहभाग नसणार आहे. हे स्पष्टपणे प्रशासकीय प्राधिकरण आहे. कारण आपण प्रोफेशनली कुंभमेळा मॅनेज केला नाही, जर दुप्पट तिप्पट गर्दी आली, तर अडचणी येऊ शकतात. त्यामुळे हे प्राधिकरण अध्यात्माचे नाही, तर मॅनेजमेंटचे आहे. अध्यात्माची बाजू साधू संत सांभाळतील. तर प्रशासनाची, व्यवस्थापनाची आणि व्यवस्थेची बाजू हे मेळा प्राधिकरण सांभाळेल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.