सिंधुदुर्गचा बीड करण्याचा प्रयत्न:राणे समर्थकांकडून दाम्पत्याला मारहाण, महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न; वैभव नाईक यांचे गंभीर आरोप

सिंधुदुर्गचा बीड करण्याचा प्रयत्न:राणे समर्थकांकडून दाम्पत्याला मारहाण, महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न; वैभव नाईक यांचे गंभीर आरोप

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील हत्येच्या घटनेने वातावरण तापले आहे. त्यात आता पुन्हा एक अशीच घटना घडली आहे. कणकवली तालुक्यातील सावडाव ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केल्याच्या रागातून नयना सावंत आणि वैभव सावंत यांना अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही मारहाण सावडाव येथील उपसरपंच दत्ताराम काटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली असल्याचा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. या संदर्भात वैभव नाईक यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत आरोप केले आहेत. माजी आमदार वैभव नाईक यांनी फेसबुकवर नयना सावंत आणि वैभव सावंत यांना मारहाण केल्यानंतरचे फोटो शेअर केले आहेत. पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची बीडचे दिशेने वाटचाल होईल, असे वैभव नाईक यांनी म्हटले आहे. या प्रकरणी कणकवली पोलिसांनी दत्ताराम काटे व इतर सात जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, अद्यापही कोणाला अटक करण्यात आली नाही. वैभव नाईक यांनी फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटले? वैभव नाईक यांनी नयना सावंत आणि वैभव सावंत यांना मारहाण झाल्यानंतरचे फोटो फेसबुकवर शेअर करत गंभीर आरोप केले आहेत. सिंधुदुर्गचा बीड करण्याचा राणे समर्थकांचा आणखी एक प्रयत्न, असा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे. वैभव नाईक म्हणाले, कणकवली तालुक्यातील सावडाव ग्रामपंचायत मधील विकास कामांमध्ये झालेला भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून सावडाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नयना सावंत व वैभव सावंत यांना भाजपचे माजी सरपंच, विद्यमान उपसरपंच आणि राणेसमर्थक दत्ताराम काटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अमानुषपणे मारहाण केली तसेच नयना सावंत यांच्या अंगावरील जॅकेट जबरदस्तीने काढले व जॅकेटच्या आत असलेले टी-शर्ट काढण्याचा प्रयत्न करून त्यांचा विनयभंग केला व त्यांना जबर मारहाण केली आहे. तसेच नयना सावंत यांना मनात लज्जा होईल अशी अश्लील वक्तव्ये, शिवीगाळ व धमकी दत्ताराम काटे यांच्याकडून देण्यात आली.आणि वैभव सावंत यांच्या गुप्तांगावर धारधार शस्त्राने जखम करण्यात आली आहे. या अमानुष मारहाणीमुळे आजही नयना सावंत व वैभव सावंत हे ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र अमानुष मारहाण व विनयभंगाचा गुन्हा घडूनही अद्यापपर्यंत कणकवली पोलिसांनी या आरोपींविरुद्ध कारवाई केलेली नाही. सत्तेत आल्यामुळे राणे समर्थकांची पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहशत सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग याची दखल घेणार का? असा सवाल नाईक यांनी उपस्थित केला आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment