सहा हजार कोटी रुपयांचा बिटकाॅइन घोटाळा:गाैरव मेहताला सीबीआयकडून समन्स, अनेक राजकीय नेत्यांची नावे, ईडीने वाढवली तपासाची व्याप्ती
६ हजार कोटी रुपयांच्या गेन बिटकाॅइन चलन घोटाळ्याप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेला ऑडिट कंपनीचा कर्मचारी गौरव मेहता याला केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) चौकशीसाठी समन्स बजावले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने सीबीआयने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. समन्स मिळताच शक्य तितक्या लवकर चौकशीसाठी हजर राहावे असे सीबीआयने मेहताला सूचित केले. २०१७ मध्ये दिवंगत अमित भारद्वाज व अजय भारद्वाज यांच्या व्हेरिएबल टेक प्रा.लि.ने ‘गेन बिटकॉइन’ या आभासी चलनाची मल्टी लेव्हल मार्केटिंग योजना राबवून बिटकॉइन स्वरूपात ६,६०० कोटी रुपये गोळा केले होते. यात बिटकाॅइन क्रिप्टोकरन्सीच्या रूपाने दर महिन्याला १० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले होते. मात्र यात अनेकांची फसवणूक झाल्यानंतर महाराष्ट्र आणि दिल्ली पोलिसांनी अनेक गुन्हे दाखल केले. बिटकॉइनला रिझर्व्ह बँकेची मान्यता नाही. या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयही (ईडी) तपास करीत असून ईडीच्या पथकाने मेहताच्या घराचीही झडती घेतली होती. मेहताचे राजकीय नेते, नोकरशहा व राजकीय व्यक्तींशी संबंधित लोकांशी लागेबांधे असल्याचे तपासात समोर आले आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीत बिटकॉइन वापरल्याचा संशय महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत बिटकॉइन व्यवहारातील अब्जावधी रुपयांचा सर्रास वापर झाल्याचा आरोप माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी केला आहे. यात मेहता याने हजारो कोटी रुपयांचा वापर केला असून त्याचे खासदार सुप्रिया सुळे व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा संबंध असल्याचा आरोपही पाटील यांनी केला आहे.