सोमनाथ सुर्यवंशी यांच्या आईच्या याचिकेवर आज औरंगाबाद खंडपीठात सुनावणी:प्रकाश आंबेडकर बाजू मांडणार

परभणी हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडी मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, सोमनाथ मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले होते. आता सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात आला आहे. सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबीयांनी न्यायाची मागणी केली असून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर आज सुनावणी होत आहे. यात कुटुंबीयांची बाजू वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे मांडत आहेत. सोमनाथ सूर्यवंशी याचा 16 डिसेंबर 2024 रोजी न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाला होता. त्याच्या शवविच्छेदन अहवालात मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले होते. तसेच सोमनाथचा मृत्यू मारहाणीत झाल्याचे न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात म्हटले आहे. सोमनाथच्या मृत्यूला पोलिस जबाबदार असल्याचेही अहवालातून पुढे आले आहे. आता या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे. मागिल सुनावणीत या प्रकरणात उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली होती. न्याय मिळत नाही तोपर्यंत लढतच राहणार – सूर्यवंशी कुटुंबीय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीकडून करण्यात येणार असला, तरी आम्हाला न्याय हवाय, अशी मागणी सोमनाथच्या कुटुंबीयांनी केली आहे. आता न्यायमूर्ती तेलगावकर यांच्या अहवालातही पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र तरीही सरकार न्याय देत नाही. जे जे दोशी आहे तर त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. सोमनाथच्या कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत लढतच राहणार असल्याचे सोमनाथच्या आई आणि भावाने म्हटले आहे. अहवाल मानवाधिकार आयोगासमोर सादर सूर्यवंशी हत्या प्रकरणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या 451 पानी गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर सादर करण्यात आला आहे. आयोगाने संबंधित सर्व पोलिसांना नोटिसा बजावून उत्तर मागितले आहे. मानवाधिकार आयोगाने याप्रकरणी राज्याचे मुख्य सचिव, गृह सचिव, अतिरिक्त पोलिस महासंचालक (गुन्हे), परभणी सीआयडीचे पोलिस उपअधीक्षक यांनाही नोटीस बजावली आहे. तर परभणी जिल्ह्यातील नवा मोंढा पोलिस ठाण्यात मारहाण करण्यात आली, असा निष्कर्ष न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांच्या चौकशीतून काढला आहे. सूर्यवंशी मृत्यू प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचे नव्याने स्पष्टीकरण सोमनाथचा मृत्यू श्वसनाच्या विकाराने झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. तसेच त्याच्या शरीरावरील जखमाही जुन्याच असल्याचे म्हटले होते. शवविच्छेदन अहवाल आणि न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवाल आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सुधारित स्पष्टीकरण दिले. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या संदर्भात पोस्टमार्टमचा रिपोर्ट वेगळा आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट जेव्हा करतो तेव्हा व्हिसेरा बाजूला ठेवलेला असतो. हा रिपोर्ट वेगळा असतो. आता व्हिसेराच्या अंतिम अहवाल हातात आला आहे. व्हिसेरा रिपोर्ट आणि पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये वेगवेगळी माहिती समोर आली आहे’ असे फडणवीस म्हणाले होते.