सोयगावमध्ये अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा सापळा रचून केला जप्त:भडगाव-चाळीसगाहून येते वाळू, बनोटीत होते अवैध वाळूची चढ्या दराने विक्री

अवैध वाळू वाहतूक करणारा टाटा हायवा ट्रक (एमएच २० ईसी ७७७३) महसूल विभागाच्या पथकाने मंगळवारी रात्री १०.३० ते १०.४५ दरम्यान संत गाडगे महाराज चौकात सापळा रचून पकडला. या कारवाईमुळे अवैध वाळू व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. महसूल विभागाने पंचनामा करून हायवा मालक करणसिंग सतीश राजपूत (रा. जंगीपुरा, ता. जामनेर) याला ३ लाख ७१ हजार रुपयांचा दंड ठोठावला. महसूल सूत्रांनी ही माहिती दिली. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, चाळीसगाव आणि भडगाव येथील गिरणा नदीतील वाळू चोरट्या मार्गाने बनोटी परिसरात चढ्या दराने विकली जात असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. बुधवारी महसूल पथकाला शेंदुर्णीहून सोयगावकडे आणखी एक अवैध वाळू भरलेला हायवा (एमएच २० ईसी ७७७१) येत असल्याची माहिती मिळाली. महसूल पथकाने तत्काळ कारवाई करत हा हायवा जप्त केला. सोयगाव महसूल विभागाने मंगळवारी रात्री पकडलेला अवैध वाळूचा हायावा ट्रक सुरक्षेचे कारणास्तव पोलिस स्टेशन सोयगाव येथे घेऊन तब्येत देण्यासाठी गेले असता उपस्थित ठाणे अंमलदारांनी नकार दिला.यावेळी आमच्याकडे गुन्हा दाखल नसल्याने आम्हाला वरिष्ठांच्या सूचनेनुसार हा ट्रक ताब्यात घेता येत नसल्याचे त्यांनी सांगितल्याने महसुलच्या पथकाने हा हायवा सोयगाव तहसील कार्यालयाच्या आवारात जमा केला आहे. पोलिसांचे दुर्लक्ष : अवैध चोरटी वाळू वाहतूक करणारा ट्रक सोयगाव येथे कार्यरत पोलिस अधिकाऱ्याच्या नातेवाईकांचा असल्याने या प्रकरणी पोलिसांना गुप्त माहिती देऊनही पोलिस अधिकारी दुर्लक्ष करीत होते. तलाठी ए.आर. चव्हाण, जी.के. गव्हाणे, व्ही.आर. शेलकर, महेंद्र वारकर, एस.के. देवतुळे आणि टी.एम. नागपुरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. तहसीलदार मनीषा मेणे जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार संभाजी देशमुख आणि सी.एस. बहुरे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. परिसरात मोठया प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असून पोलिसांनी आता कंबर कसल्याने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे आता धाबे दणाणले असल्याचे दिसून येत आहे. ट्रक पोलिस स्टेशन आवारात लावण्यास पोलिसांचा नकार