एसटी महामंडळावर आता केवळ मराठीतूनच संदेश:गुढीपाडव्यापासून अंमलबजावणी सुरू; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

येत्या गुढीपाडव्यापासून मराठी नववर्ष सुरू होत आहे या मुहूर्तावर राज्यामध्ये परिवहन विभागामार्फत नोंदणी झालेल्या प्रत्येक व्यावसायिक वाहनावर लिहिले गेलेले सामाजिक संदेश हे मराठीत असले पाहिजेत असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला दिले आहेत. या संदर्भात मंत्री सरनाईक म्हणाले की, महाराष्ट्र राज्याची मराठी ही अधिकृत राज्य भाषा आहे. महाराष्ट्रातील नागरिक हे प्रामुख्याने मराठी भाषिक आहेत. देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. सहाजिकच मराठी भाषेचे संवर्धन करणे ही शासनाची नैतिक जबाबदारी आहे. तथापि, राज्यात नोंदणी असलेल्या अनेक व्यावसायिक वाहनांवर सामाजिक संदेश, जाहिरात आणि प्रबोधनात्मक माहिती हिंदीत किंवा इतर भाषांमध्ये लिहीलेले असतात. (उदा . बेटी बचाव बेटी पढाव) त्यामुळे मराठी भाषेच्या प्रचार व प्रसारवर बंधने येतात. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर राज्य सरकारचा निर्णय या पुढे असे सामाजिक संदेश, जाहीरात व प्रबोधनात्मक माहिती मराठी भाषेत प्रदर्शित केल्यास ( उदा . मुलगी वाचवा..मुलगी शिकवा..!) महाराष्ट्रातील जनतेला अधिक उपयुक्त माहिती मिळेल आणि मराठी भाषेचा प्रचार व प्रसार होईल. तसेच मराठी भाषेचा योग्य सन्मान राखला जाईल. त्यासाठी येत्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्र राज्यात नोंदणीकृत असलेल्या सर्व व्यावसायिक वाहनांवरील सामाजिक संदेश तसेच इतर महत्वाच्या जाहीराती व प्रबोधनात्मक माहिती मराठी भाषेत लिहीण्याची अंमलबजावणी सुरु करावी. तसे निर्देश परिवहन आयुक्त यांना दिल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले. ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने इतर ठिकाणी बदली एसटी महामंडळात एकाच मुख्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त काळ ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने इतर ठिकाणी बदली करा, असे निर्देश एसटी प्रशासनाला दिले. याबाबत आज आमदार गोपिचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनेची एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात बैठक संपन्न झाली. यावेळी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्या संदर्भात सविस्तर चर्चा झाली. अधिवेशन संपल्यानंतर माननीय मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून कर्मचाऱ्यांना योग्य न्याय दिला जाईल, असे आश्वासन सरनाईक यांनी शिष्टमंडळाला दिले. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी विस्तारित जागा देणे तसेच नाशिक- पुणे महामार्गा वरुन जाणाऱ्या बसेस संगमनेर बसस्थानकामध्ये थांबवणे आदी विषयांवर आमदार अमोल खताळ – पाटील व आमदार सत्यजित तांबे यांच्या शिष्टमंडळासमवेत चर्चा केली. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार इतर वरीष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.