राज्यातील परमिट रूम व्यावसायिकांचा सरकारला इशारा:व्हॅट कमी करण्यासह अवैध मद्य विक्रीवर कारवाईसाठी 20 मार्चला बंद

अमरावती डिस्ट्रीक्ट परमिट रुम असोसिएशनने मोठा निर्णय घेतला आहे. संघटनेने २० मार्चला राज्यव्यापी बंद पाळण्याची घोषणा केली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष नितीन मोहोड यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, शासनाने व्हॅट पाच टक्क्यांवरून दहा टक्के केला आहे. मात्र इतर मद्य व्यवसायिकांवरील व्हॅट तसाच ठेवला आहे. संघटनेची मागणी आहे की व्हॅट हा मद्यनिर्मितीच्या ठिकाणीच आकारला जावा. मोहोड यांनी सांगितले की ढाबे आणि हातगाडीवाल्यांकडून अवैध मद्य विक्री होत आहे. ते अंडा-ऑम्लेटच्या नावाखाली मद्यप्रेमींना खुली जागा उपलब्ध करून देतात. पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. या विषयावर राज्य सरकारमधील प्रमुख मंत्री आणि स्थानिक अधिकाऱ्यांना कळवले आहे. परंतु अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. उलट अनधिकृत व्यवसाय वाढत असून, लायसन्सधारक परमिट रूम व्यावसायिकांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. १७ मार्चला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्यास बंद मागे घेण्याची शक्यता आहे. या पत्रकार परिषदेला असोसीएशनचे सचिव आशीष देशमुख, सुनील खुराणा, विनीत औगड, सचिन तिवारी, शैलेष मुंढे आदी पदाधिकारी उपस्थित होते.