राज्यातील कर्जमाफीसह सोयाबीन, कापूस दराच्या प्रश्नावर लक्ष द्या:क्रांतीकारी शेतकरी संघटनेची कृषीमुल्य आयोगाच्या अध्यक्षांकडे मागणी

राज्यात निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासना प्रमाणे शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेकडे लक्ष लाऊन बसला आहे तर दुसरीकडे सोयाबीन अन कापसाला भाव दिला जात नाही. या प्रश्नांवर कृषीमुल्य आयोगाचे अध्यक्ष या नात्याने आपण लक्ष घालावे, अशी मागणी क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी ता. 20 दिल्ली येथे आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्याकडे केली आहे. या संदर्भात क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष नामदेव कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, रामेश्वर कावरखे, अमोल एकशिंगे, प्रवीण मते पाटील, संतोष माहूरकर, वाशिम जिल्हाध्यक्ष बालाजी मोरे, सतीश विडोळे, शामराव मते, देवानंद जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिल्ली येथे महाराष्ट्र सदनामध्ये कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची भेट घेतली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा केली. निवडणुकीपुर्वी शासनाने कर्जमाफीचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले आहे. मात्र सरकार स्थापन झाल्यानंतरही कर्जमाफीची कुठल्याही प्रकारची घोषणा सरकारने केलेली नाही. कर्जमाफीच्या विश्वासावर बसलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याला बँकेकडून होल्ड लावला जात आहे. त्यामुळे एकीकडे कर्जमाफी नाही तर दुसरीकडे खात्याला होल्ड लावल्याने पैसे काढता येत नाही. या परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगायचे कसे असा सवाल उपस्थित करण्यात आला. या सोबतच शेतीमालाला योग्य भाव दिला जात नाही. सोयाबीन, कापूस या प्रमुख पिकांचे भाव चांगलेच कोसळले आहे. अतिवृष्टीमध्ये पिकांचे नुकसान झाल्यानंतरही शेतकऱ्यांनी कसेबसे आहे त्या पिकाची काढणी केली. मात्र उतारा घटल्यामुळे लागवडीचा खर्चही निघाला नाही. त्यामुळे सध्या राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नमुद केले. संपूर्ण कर्जमाफीची घोषणा शासनाने त्वरीत करावी, सोयाबीन, कापूस व इतर शेतीमालास भाव द्यावा यासह इतर मागण्यांकडे लक्ष देण्याची अग्रही मागणी केली. यावेळी आयोगाचे अध्यक्ष पटेल यांनी लवकरच मुंबई येथे बैठक घेण्याचे आश्वासन पदाधिकाऱ्यांना दिले आहे