वक्तव्यातून कायदा, सुव्यबस्था बिघडणार नाही, याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे:अजित पवारांकडून नितेश राणेंना समज

राजकारणात काम करताना मी सुसंस्कृत महाराष्ट्र घडवणाऱ्या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या शिकवणीचे कायम स्मरण करतो. त्यांच्याच विचाराने महाराष्ट्राचं भलं होणार आहे. सगळ्या घटकांना न्याय मिळणार आहे. त्यामुळं राजकीय जीवनात असेपर्यंत मी चव्हाण साहेबांची विचारधारा सोडणार नाही, असं अभिवचन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कराडच्या प्रीतिसंगमावरून दिले. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त कराडच्या प्रीति संगमावरील समाधिस्थळी अजित पवारांनी सकाळी अभिवादन केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, आज सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील काही लोक वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत. ती वक्तव्ये सुसंस्कृत महाराष्ट्राला परवडणारी नाहीत. यापूर्वी यशवंतराव चव्हाण साहेबांसारख्या अनेक नेत्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करताना जातीय सलोखा ठेवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचा सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे. छावा चित्रपटाच्या माध्यमातून संभाजी महाराजांचा इतिहास नव्या पिढीसमोर आणण्याचं काम झाले असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले. तसेच हल्ली सर्वच पक्षांतील नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत. आपल्या वक्तव्यातून कायदा, सुव्यवस्था बिघडणार नाही, याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. कोणत्याही विशिष्ट समाजाबद्दल वक्तव्यं टाळली पाहिजेत, असं आवाहनही त्यांनी केले. नितेश राणेंनी मुस्लिम बांधवांबद्दल वक्तव्य का केले, ते कळत नाही देशाबद्दल प्रेम असणारा मुस्लिम समाज संपूर्ण देशात तसेच महाराष्ट्रात आहे, असं सांगून अजितदादा म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाला बरोबर घेऊन स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या सैन्यातील अनेक विभागप्रमुख हे मुस्लिम होते. ज्यांनी इतिहासाचं खोलवर संशोधन केलंय. त्यांनीच या बाबी अभ्यासातून समोर आणल्या आहेत. त्यामुळं आमदार नितेश राणेंनी मुस्लिम बांधवांबद्दल वक्तव्य का केलं, ते कळत नाही, अशा शब्दांत त्यांनी राणेंना फटकारलं. कोयना धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावणार अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यावर वेळ पडल्यास साताऱ्यात येऊन किंवा मुंबई, पुण्यात बैठक घेऊन कोयना धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावेळी सांगितलं. पत्रिसरकार म्हणून ओळख असणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीचा रौप्य शतक महोत्सव आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या स्मारकाच्या कामात मी स्वतः लक्ष घातलं आहे. त्यांच्याबद्दल प्रेम असणाऱ्यांना अभिमान वाटेल असं काम निश्चित केलं जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. राज्याचा सर्वांगीण विकास लक्षात ठेवून अर्थसंकल्प – अजित पवार सरकार अर्थसंकल्प सादर करते त्याला मंत्रिमंडळ मान्यता देत असते. त्यावरही मुख्यमंत्री यांची असते. हा एकाचा विभाग आ दुसऱ्या विभाग असे होत नसते. अशा शब्दात अजित पवार यांनी महायुतीमधील काही मंत्र्यांच्या विभागाला कमी निधी मिळाला असल्याच्या आरोपावर प्रत्युत्तर दिले आहे. राज्याचा सर्वांगीण विकास लक्षात ठेवून समतोल विकास कसा साधता येईल आणि गरीब घटकाला न्याय कसा देता येईल, हे बघूनच आपण अर्थसंकल्प सादर केला असल्याचे ते म्हणाले.